लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आता प्रशासनाकडून कडक उपाययोजना करण्यात येत आहेत. मनपा अतिक्रमण निर्मुलन विभागाच्या पथकाने कारवाईचा धडाका सुरुच ठेवला आहे. सोमवारी भाजपचे गटनेते भगत बालाणी यांच्या मालकीचे असलेल्या बालाणी लॉनसह, शानभाग सभागृह, आर्यन रिसोर्ट व रॉयल पॅलेसचे सभागृह सील केल्यानंतर, मंगळवारी या मंगल कार्यालय व लॉन चालकांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंड मनपा प्रशासनाने ठोठावला आहे. यासह गुन्हे दाखल करण्याचे आदेश देखील मनपा प्रशासनाने दिले आहेत.
कोरोना रुग्णांची संख्या आता शहरात झपाट्याने वाढत आहे. यामुळे मनपा प्रशासन देखील ॲक्शन मोडमध्ये आले असून, शहरातील रस्त्यांवर मास्क न लावणाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरु केला आहे. तसेच लॉन व मंगल कार्यालयांमध्ये होणाऱ्या लग्नसमारंभ व कार्यक्रमांमधील गर्दीवर देखील मनपा प्रशासनाचे लक्ष असून, सोमवारी मनपा उपायुक्तांनी भाजप गटनेते भगत बालाणी यांचे बालाणी लॉन, शानभाग सभागृह, आर्यन रिसॉर्टसह रविवारी देखील काही मंगल कार्यालये सील केली होती. आता या मंगल कार्यालय व लॉन चालकांना मनपाने ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांची पायमल्ली केल्याने गुन्हा देखील दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, सर्व लॉन व मंगल कार्यालय चालकांना दंड भरल्याशिवाय सील उघडले जाणार नसल्याचेही सांगितले आहे. तसेच सील उघडल्यावर देखील नियम मोडले तर कारवाईचा इशारा देखील मनपा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
हरिविठ्ठल नगरातील आठवडे बाजार केला बंद
मंगळवारी शहरातील हरिविठ्ठल नगरात आठवडे बाजार भरत असतो. दुपारी बाजार भरण्याआधीच मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांचे पथक या भागात पोहचले, तसेच बाजारात दुकाने मांडणाऱ्यांना वेळीच दुकाने न लावण्याचा सूचना दिल्या. यासह बाहेरगावाहून आलेल्या सर्व विक्रेत्यांना या ठिकाणी बसू दिले नाही. दरम्यान, बुधवारी होणारा पिंप्राळा येथील आठवडी बाजार देखील बंद राहणार असून, विक्रेत्यांनी गर्दी केल्यास कारवाईचा इशारा मनपा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
मास्क न लावणाऱ्या ६७ जणांवर कारवाई
मनपा व पोलीस प्रशासनाकडून शहरात नागरिकांना शिस्त लावण्याचे काम सुरुच असून, मंगळवारी देखील मनपा प्रशासनाकडून मास्क न लावणाऱ्या ६७ जणांवर कारवाई करण्यात आली असून, प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मनपाकडून ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.