लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाला मार्केटमध्ये नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी किरकोळ ग्राहकांना व विक्रेत्यांना बाजार समितीत प्रवेश बंद करण्याचे आदेश उपायुक्त संतोष वाहुळे यांनी बाजार समिती प्रशासनाला दिले आहेत. केवळ परवानाधारक विक्रेत्यांनाच बाजार समितीत प्रवेश देण्याचा आदेश त्यांनी दिला आहे. तसेच गर्दी टाळण्यासाठी आता भाजीपाला व फळ बाजार तीन वेगवेगळ्या ठिकाणावर भरणार असल्याची ही माहिती उपायुक्तांनी दिली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये दररोज सकाळी लिलावादरम्यान हजारो नागरिकांची गर्दी होत आहे. तसेच या गर्दीदरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे पालनदेखील याठिकाणी होताना दिसून येत नाही. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर मंगळवारी सकाळी सहा वाजता उपायुक्त संतोष वाहुळे यांनी बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये पाहणी केली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी बाजार समिती प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत भाजीपाला बाजार मार्केटमधील तीन ठिकाणी भरण्याचा निर्णय घेण्यात आला, तर फळ बाजार हा बाजार समितीच्या आवारात असलेल्या गुरांचा बाजाराच्या ठिकाणी भरण्यात यावा, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच बाजार समिती परिसरात लहान रिक्षांना बंदी घालून, मुख्य प्रवेशद्वारात केवळ येण्यासाठी, तर दुसऱ्या प्रवेशद्वाराचा वापर जाण्यासाठी करण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला. तसेच लिलावादरम्यान बाजार समितीचे पथक व एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कर्मचारी देखील उपस्थित राहणार आहेत.
नेरी नाका परिसरातील अनधिकृत हॉकर्सवर कारवाई
मंगळवारी नेरी नाका परिसरात अनेक हॉकर्सने दुकाने थाटली होती. तसेच या ठिकाणी दुपारी बारा वाजेनंतर देखील नागरिकांची गर्दी असल्याने मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने जोरदार कारवाई करत २० विक्रेत्यांचा माल जप्त केला. तसेच काशीबाई उखाजी कोल्हे शाळा परिसरात देखील मंगळवारी मोठा बाजार भरला होता. या ठिकाणी देखील मनपाच्या पथकाने जाऊन हा बाजार उठवला. तसेच या ठिकाणी १६ विक्रेत्यांचा माल जप्त करण्यात आला. कारवाईदरम्यान मनपा कर्मचारी व विक्रेत्यांमध्ये किरकोळ वाददेखील झाला होता.