चिनावल, ता. रावेर : केळी वाहतुकीत येणारी अडचण दूर झाल्यामुळे गुरुवार पासून केळी कापणीला सुरुवात झाली असून हा माल ट्रकमध्येही भरला जाऊ लागला आहे. शासनाने या मालाच्या वाहतुकीस संचारबंदीतही परवानगी दिली असताना केवळ बाहेरील राज्यात ट्रक्स नेता येत नव्हते. मात्र आमदार शिरीष चौधरी आणि चंद्रकांत पाटील यांनी हा प्रश्न पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मांडल्यावर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केल्यावर हा प्रश्न सुटू शकला.कोरोनाचा संसर्ग अधिक फैलावू नये यासाठी राज्य शासनाने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे काढणी योग्य परिपक्व झालेले केळी काढून विक्रीस तयार असताना देशभर लोकडाऊन असल्यामुळे उत्तर भारतातील बाजारपेठा देखील बंद आहेत त्यामुळे केळी बाजारात नेण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे घामाने पिकवलेल्या सोन्यासारख्या शेतमालाची माती होते की काय अशी महाभयंकर परिस्थिती केळी उत्पादक शेतकरी राजावर ओढावली होती. त्यात तोंडावर असलेले हसू आता अश्रूत परिवर्तित होणार असताना केळी फळाला अत्यावश्यक सेवेचा दर्जा मिळून नियार्तीसाठी परवानगी मिळावी अशी मागणी कोचुर येथील पंकज पाटील व कमलाकर पाटील यांचेसह मोठे वाघोदा, सावदा, उधळी, रणगाव, रायपुर , खिर्डी, निंबोल, ऐनपुर, तांदलवाडी येथील शेतकऱ्यांनी आमदार चंद्रकांत पाटील तर चिनावल खिरोदा, रोझोदा, सावखेडा, कुंभारखेडा, येथील शेतकऱ्यांनी आमदार शिरीष चौधरी यांना फोनवरून केली होती. दोघा आमदरांनी लागलीच अॅक्शन मोडमध्ये येत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे शेतकºयांची कैफियत मांडली होती. त्यानुसार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केल्याने शेतकºयांबाबतीत संवेदनशील असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लागलीच पंजाब , उत्तरप्रदेश व मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा केल्याने केळी निर्यातीचा मार्ग मोकळा झाला असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.केळी मजुरांची सुरक्षा ही गरजेचीआजपासून केळी कापणी सुरुवात झाली असली तरी एका मालगाडीवर किमान वीस ते कमाल चाळीस केळी मजूर लागत असतात त्यांच्या सुरक्षेसाठी म्हणून त्यांना मास्क व हात मोजे याचे सह सामाजिक अंतर ठेवणे गरजेचे आहे असे मत केळी युनियनचे उपाध्यक्ष कमलाकर पाटील यांनी व्यक्त केले.
वाहतुकीचा प्रश्न सुटल्याने केळी कापणी सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 9:06 PM