केऱ्हाळे, ता. रावेर : सतत कमी भावाच्या गर्तेत सापडत असलेला केळी उत्पादक यावर्षी समाधानकारक भाव हातात पडत असल्यामुळे बऱ्यापैकी खूश दिसत आहे . दिल्ली रेल्वे रॅक सुरू झाल्याने हे चांगले दिवस आले आहे. अन्यथा गत अनेक वर्षांपासून सुरू असलेली दराबाबतची घुसमट आतासुद्धा ‘जैसे थे’ राहिली असती.
रॅकमध्ये आठवड्याला जातो ११ हजार क्विंटल माल
रेल्वेद्वारे दिल्ली जाणारा माल कमी वेळेत चांगल्या दर्जाचा व कमी भाड्याने जात असल्यामुळे व्यापाऱ्यांनासुद्धा पाठवलेल्या मालाचे पैसे करता येत आहेत. सहाजिकच परतावा जर चांगल्या प्रमाणात व ग्यारंटीने मिळत असेल तर योग्य भावात खरेदी करणे सहज शक्य होत असते. यामुळे व्यापाऱ्यांसह शेतकरीही स्वतंत्र डबे भरून आपला माल दिल्लीत पाठवत असून स्वतः विक्री करून पैसे मिळवत आहे. याचाच परिणाम म्हणून केळीपट्ट्यात शेतकऱ्यांचा माल शेतात तुंबत नसून बागांची गरजेनुसार कापणी होऊन खाली होत आहेत.
मालाची सतत मागणी
मालाची सतत मागणी करण्यात येत असून मालाची उचल होत असल्याचे पाहता त्याला अनुसरून पुरवठा होत आहे. बाजारपेठेतील मागणी व पुरवठ्याचा ताळमेळ साधता आला तरच भावाचे संतुलन टिकवून ठेवण्यास मदत होत असल्याचे यावरून दिसून येत आहे.
आठवड्यात भरले जातात दोन रॅक
एका आठवड्यात तीन दिवसांच्या अंतराने असे दोन रॅक भरले जातात यामध्ये सावादा व रावेर मिळून व्यापारी व शेतकरी सदस्य आहेत. २४ डब्यांच्या एका रॅकमध्ये ५५०० क्विंटल माल असा दोन रॅकमध्ये ११ हजार क्विंटल माल रेल्वे घेऊन जात असल्यामुळे उर्वरित माल हा ट्रकने लोंडिंग करणाऱ्या व्यापाऱ्यांनाही बोर्ड भावाला अनुसरूनच द्यावा लागत आहे. अन्यथा शेतकरी साफ नकार देत असल्याचे चित्र आहे.
अत्यंत चांगल्या प्रतीच्या मालाला आजही १३५० पर्यंतचा बाजारभाव मिळत आहे. तर साधारण मालालासुद्धा १ हजारपेक्षा कमी भावाने मागणी केली जात नसल्याचे वास्तव आहे. अन्यथा शेतकऱ्यांकडून सरळ नकार दिला जात आहे.
मोठ्या कालखंडानंतर शेतकऱ्यांसाठी सचोटीने केंद्र सरकारकडे प्रयत्न करून वॅगन उपलब्ध करून देण्यासाठी खासदार रक्षा खडसे यांच्या पाठपुराव्याचे फळ असल्याचे अनेक शेतकऱ्यांकडून यासंदर्भात बोलले जात आहे.
कमी दरात रेल्वेने वॅगन उपलब्ध झाल्यामुळेच केळी राजधानी दिल्लीत पोहोचवणे शक्य झाले. यामुळे केळी बागांमध्ये न तुंबता वेळीवेळी खाली होत आहे. त्यामुळे भावातील स्थिरता ठेवणे शक्य होत आहे.
- रामदास त्र्यंबक पाटील, अध्यक्ष, फळ बागायतदार शेतकरी मंडळ व केळी भाव समिती रावेर
फोटो : रावेर येथील रॅकमध्ये लोंडिंग करताना रामदास पाटील व काही शेतकरी. (छाया : रमेश पाटील)