हरताळा, ता.मुक्ताईनगर : हरताळे परिसरात पुरेशा पाण्याअभावी व वैशाखाच्या तीव्र उन्हामुळे अर्धवट सुकलेल्या केळीच्या बागा उपटून फेकण्यात येत आहेत. मे महिन्याच्या शेवटी आता काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला असता, वैशाखाच्या वणव्यात भूजल पातळीही झपाट्याने खालावली आहे. त्यामुळे पाण्याचे संकट गंभीर बनत आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या शेतातील कूपनलिका बंद पडल्या आहेत. अतिशय कमी पाण्यावर केळी बागा वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहेत.
येथील सुलोचना रत्नाकर कुलकर्णी नामक शेतकऱ्याने गटनंबर ४७४/१ मधील शेतात तीन हजार केळी खोड पाणी नसल्याने उपटून फेकले आहेत. वर्षभर केळीची निगा राखली. आता संपूर्ण खर्च वाया गेला आहे. एवढेच नव्हे, तर केळीबागा वाचविण्यासाठी नवीन दुसऱ्या ठिकाणावरील केळी वाचविण्याची धडपड सुरू आहे. यंदाच्या हंगामाचा खर्च वाया गेला आहे. पाणी कमी असल्याने केळीच्या बागा उपटून भेटण्याची वेळ आली आहे.
बागा वाचविण्यासाठी धडपड
अनेक ठिकाणी शेताच्या बांधावर चारही बाजूंनी केळी व बचावासाठी कपड्यांचा आडोसा करण्यात आला आहे. अपूर्ण पाण्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. लागलेला पैसा व व्यापाऱ्याकडून घेतलेला कर्जाचा पैसा परतफेड करणे कठीण झाले आहे. पाण्याअभावी केळी मे हीटच्या उन्हाच्या तडाख्यामुळे आणि वादळाच्या भीतीमुळे यंदाही शेतकरी केळी लागवडीसाठी धजावत नव्हता. कूपनलिकाही अर्ध्यावरच बंद पडल्या आहेत. केळीच्या बागा सोडाव्या लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यातच केळ्यालाही पाहिजे तसा भाव नसल्याने, शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त होत आहे.
केळी गुरांच्या पुढे
सध्या केळ्याला कमी भाव मिळत आहे. मात्र, वाढत्या उन्हामुळे केळी उपटून फेकण्याची वेळ आली आहे. केळ्याचा वापर गुरांचा चारा म्हणून उपयोगासाठी होत आहे. पावसाळा तोंडावर येऊन ठेपला असला, तरीही केळी उपटून फेकण्याची वेळ आली आहे. दरवर्षी अशा प्रकारे डझनभर शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. काही शेतकऱ्यांनी ओझरखेडा येथील तलावातून स्वखर्चाने पाइपलाइन करून पाणी आणले आहे. मात्र, यंदा या ओझरखेडा तलावात हतनूर धरणाचे पुराचे पाणी सोडण्यात आले नव्हते. त्यातही काही प्रमाणामध्ये काही शेतकऱ्यांच्या बागा धरून आहे, तर काहींकडे पाणी पातळी खोल गेल्याने व दुसरी कोणतीही सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने, केळी उपटून फेकण्याचे संकट शेतकऱ्यांवर येत आहे. यासाठी कायम सिंचनाची सुविधा उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे आहे.