उचंदे/चांगदेव, ता.मुक्ताईनगर : येथे व परिसरात रविवारी रात्री झालेल्या वादळी वाºयासह झालेल्या पावसाने केळी बागा उद्ध्वस्त झाल्या. यासोबतच मका, ज्वारी, कापूस या पिकांचेही नुकसान झाले आहे. यामुळे बळीराजा हळहळ व्यक्त करीत आहे.चांगदेव परिसरात २० सप्टेंबरला रात्री दहा वाजता आलेल्या वादळी वाºयासह पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही शेतकऱ्यांची केळी जमीनदोस्त झाली आहे. मका, ऊस, कापूस, ज्वारी जमीनदोस्त झाली आहे. शेतकºयांचे लाखोचे नुकसान झाले आहे. तत्काळ पंचनामे करण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.उचंदेसह परिसरातील खामखेडा, पंचाने, मेळसांगवे आदी गावातील शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापणीवर असलेली केळीची झाडे जमीनदोस्त झाली आहेत. कपाशी पूर्णत: झोपली आहे तर ज्वारीचे व मक्याचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून उचंदा परिसरात काही ना काही कारणास्तव शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गेल्या महिनाभरापासून केळीवरील सीएमव्ही व्हायरसमुळे शेतकरी आपली केळी वाचवण्यासाठी मेहनत घेत आहे. शासनाने पंचनामे केले परंतु तेही २५ ते ३० टक्क्यांच्या आत केले आहे. यामुळे केळी उत्पादकांचा लागलेला खर्चदेखील निघणार नाही. या संकटावर मात करत असताना पुन्हा वादळाने केळी, कपाशी, ज्वारी, मका या पिकांवर घाला घातला आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त झाला आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
मुक्ताईनगर तालुक्यात वादळी वाऱ्याने केळी बागा उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 12:45 AM