लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : केंद्र सरकारच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विविध संस्था आणि संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला जळगाव शहरात उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे व पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांच्यात शाब्दिक चकमक झाली.
सकाळपासूनच मुख्य बाजारपेठेतील दुकाने बंद होती. त्यासोबतच ज्या व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू ठेवली होती. त्यांना देखील विविध संस्था, संघटना आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दुकाने बंद ठेवण्याचे विनंतीवजा आवाहन केले. व्यापाऱ्यांनी बंदच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. मात्र गणेश कॉलनी, महाबळ या भागांमध्ये व्यवहार बहुतांश प्रमाणात सुरळीत होते. राष्ट्रीय महामार्गावर आंदोलकांनी टायर जाळून वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला.
सकाळी टॉवर चौकात महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे नेते, लोक संघर्ष मोर्चा, विद्युत कामगार संघटना यांचे प्रतिनिधी एकत्र आले होते. त्यांनी तेथे निर्दशने केली. शेतकरी कायदे परत घेण्याची मागणी देखील केली.