जामनेर : जामनेर तालुक्यात सुमारे ५० टक्के गोर बंंजारा समाज असूनदेखील राजकीय नेत्यांकडून समाजास नेहमीच दुय्यम वागणूक दिली जात असल्याची खंत संत सेवालाल जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात समाजबांधवांनी व्यासपीठावरून व्यक्त केली. आगामी निवडणुकीत या समाजाला प्रतिनिधीत्व मिळावे, असा सूर येथील बाजार समितीच्या आवारात कार्यक्रमात उमटला. संत सेवालाल जयंती रविवारी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्या वेळी या उत्सवाच्या माध्यमातून बंजारा समाजाने शक्तीप्रदर्शन केले.रविवारी सकाळी पहूर चौफुलीपासून सेवालाल जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीत तालुक्यातील हजारो समाजबांधव सहभागी झाले होते. पारंपारिक वेश व आभुषणे परिधान करून महिला सहभागी झाल्या होत्या. गोर बंजारा समाजाची संस्कृती दर्शविणारे कार्यक्रम यावेळी सादर केले गेले.बाजार समितीत झालेल्या कार्यक्रमात आमदार हरिभाऊ राठोड यांनी संत सेवालाल यांच्या प्रतिमेचे पूजन केले. उत्सव समितीचे अध्यक्ष लालचंद चव्हाण, कार्याध्यक्ष कैलास राठोड, उपाध्यक्ष राजेश नाईक, कोषाध्यक्ष राजेश नाईक व सचिव मुलचंद नाईक यांनी उपस्थितांचे स्वागत केले.ओंकार जाधव, दौलत नाईक, कल्पणा चव्हाण, साधना राठोड (परभणी), उत्तम राठोड, आत्माराम जाधव, रायसिंग बापू व गोरबंजारा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.सुनीता पवार व आमदार हरिभाऊ राठोड यांची भाषणे झाली. गणेश पवार यांनी सूत्रसंचालन केले.सेवालाल जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. उत्सव समितीच्या सदस्यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.समाजाचे कार्यकर्ते संजय राठोड (बुलडाणा) यांनी सांगितले की, गोरबंजारा समाजाने राजकारणात आपली ताकद दाखवून द्यावी. जामनेर मतदार संघातून समाजाचा उमेदवार निवडून येऊ शकतो. त्यासाठी एकजूट दाखवावी, असे आवाहनही राठोड यांनी केले.धनगर समाजास आरक्षण देण्यास टाळाटाळराज्य सरकार धनगर समाजास आरक्षण देण्यास टाळाटाळ करीत आहे, असा आरोप आमदार हरीभाऊ राठोड यांनी केला. हे आरक्षण दिल्यास आदिवासी नाराज होतील अशी भिती शासनकर्त्यांना आहे, असे आमदार हरीभाऊ राठोड यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले. २५ फेब्रुवारीला मुंबईतील आझाद मैदानावर ओबीसींचा विराट मोर्चा निघणार असून यात उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले.
आगामी निवडणुकांमध्ये बंजारा समाजास प्रतिनिधित्व मिळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 11:47 PM