प्रमोद पाटील
कासोदा, ता.एरंडोल : येथे एकच राष्ट्रीयकृत बॅंक आहे, पण दररोज या बॅंकेत गर्दीचे रेकार्ड मोडले जात आहे. कोरोनाची मोठी भीती असल्यावरदेखील स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांना मोठ्या गर्दीत तासन्तास थांबावे लागते. येथे सेंट्रल बॅंकेतील गर्दी कमी करण्यासाठी कोणी काही प्रयत्न करणार का, असा संतप्त सवाल जनतेतून विचारला जात आहे.एरंडोल तालुक्यातील सर्वात मोठे गाव कासोदा आहे. ४०हजारांच्या पुढे लोकसंख्या आहे. सुमारे २०-२५ खेडी या गावाला लागून आहेत. या सर्वांचा कासोदा येथील सेंट्रल बॅंकेशी संबंध येतो. कोणत्याही सरकारी योजेनेचा लाभ या बॅंकेत येतो. विद्यार्थ्यांना मिळणारे दोन-तीनशे रुपये घेण्यासाठीही गरीब पालकांची येथेच गर्दी होत असते. अशा अनेक योजनांमधून येणारे पैसे घेण्यासाठी याच बॅंकेत यावे लागते, त्यामुळे दररोज येथे तोबा गर्दी होत असते, सुरक्षा रक्षक, क्लर्क, उपव्यवस्थापक, कृषी अधिकारी, शिपाई ही पदे गेली अनेक वर्षे रिक्त आहेत. वादावादी, शिवीगाळ, नंतर पोलिसांना पाचारण हे अगदी नित्याचेच झाले आहे. या गावात अजून एखाद्या बॅंकेची शाखा उघडावी, अशी मागणी येथील जनतेतून होत आहे. ४५ हजार खाती आहेत. शासकीय योजनांचे पैसे व इतर कामांसाठी येथे गर्दी होते. याआधी फक्त दोनच कर्मचारी होते. मार्च आहे म्हणून एक कर्मचारी सध्या आला आहे. गर्दीमुळे वेतागलेले ग्राहक व महिला ग्राहक शिवीगाळदेखील करतात. मोठा वाद झाल्यानंतर पोलिसांना बोलवावे लागते. हे तर नित्याचेच आहे. वरिष्ठांना कर्मचाऱ्यांबाबत अनेकदा मागणी केली, पण कुणीही लक्ष देत नाही.-राजीव शर्मा, व्यवस्थापक सेंट्रल बँक, कासोदा, ता.एरंडोल