आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २९ - भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ हे कुणाची तरी चमचेगिरी करून पदरात पदाचा लाभ पाडून घेण्यासाठी माजी मंत्री खडसे यांच्या ताब्यात असलेल्या जिल्हा बँकेची बदनामी करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याची टीका जिल्हा बँकेचे संचालक अनिल भाईदास पाटील यांनी सोमवार, २८ रोजी दुपारी जिल्हा बँकेत आयोजित पत्रपरिषदेत केली.शेतीचा हंगाम जवळ आलेला असतानाही जिल्हा बँकेकडून पिक कर्ज वाटपास दिरंगाई होत असल्याचा तसेच बँकेचे स्थानिक संचालक शेतकऱ्यांची भूमिका बँकेत मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याऐवजी उगीचच आकाशवाणी करीत असल्याचा आरोप भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी केला होता. त्याला वाघ यांचे प्रतिस्पर्धी व राष्टÑवादीचे जिल्हा बँक संचालक अनिल भाईदास पाटील यांनी सोमवारी पत्रपरिषदेद्वारे उत्तर दिले. ते म्हणाले की, कर्जमाफीचे कामकाज लांबल्यामुळे जिल्हाभरातील गटसचिव शेतकरी कर्जमाफीच्या कामात व्यस्त होते. त्यामुळे गटसचिवांना त्यांच्या संस्थेचे त्रैवार्षिक तक्ते तयार करून बँकेकडे मंजुरीसाठी पाठविण्यास विलंब झाला. मार्च २०१८ अखेर एकही तक्ता बँकेकडे मंजुरीसाठी प्राप्त झालेला नव्हता. मात्र एकही शेतकरी सभासद कर्जापासून वंचित राहू नये यासाठी बँकेने कर्ज मंजुरी तक्ते बँकेकडे पाठविण्यास जून २०१८ अखेरपर्यंत मुदतवाढ दिली. कर्जमंजुरी तक्ते का प्राप्त होत नाहीत? याची चौकशी करण्यासाठी गटसचिवांची तालुकास्तरावर बैठक बँकेच्या अधिकाºयांसह बोलविली होती. तेव्हा तक्त्यातील प्रत्येक सभासदाचे आधारकार्ड नंबर अनिवार्य असल्याने त्याची पूर्तता करण्यास शेतकºयांकडून विलंब होत असल्याने या तक्त्यांना विलंब झाला. त्यात बँक किंवा बँकेचे विद्यमान संचालक कोठेही कमी पडलेले नाहीत. मात्र भाजपा जिल्हाध्यक्ष वाघ यांनी ही बँक भाजपाचेच माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या ताब्यात असल्याचे माहित असतानाही कुणाची तरी चमचेगिरी करण्यासाठी हेतूपूर्वक आरोप केले.वास्तविक मार्चनंतर जसजसे तक्ते प्राप्त झाले तसतसे ते मंजूर करण्यात आले. बँकेच्या जिल्ह्यातील ८७७ सभासद संस्थांपैकी प्राप्त ७२६ संस्थांचे सर्वच्या सर्व तक्ते जिल्हा बँकेने आजअखेरपर्यंत मंजूर करून पाठविले आहेत. जिल्हा बँकेने आतापर्यंत एकूण २०० कोटींचे पिककर्ज वाटप केलेले आहे. हे काम जलद गतीने सुरू आहे.शासनाचे धोरण व आरबीआयच्या नियमामुळे शेतकºयांचे प्रचंड हाल शासनाकडून केले जात आहेत. एटीएममधून पैसे काढणे हा नियम बँकेचा नसून शासनाचा आहे. या विरोधात राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बँकेच्या माध्यमातून शासनाकडे शेतकºयांच्या समस्या मांडून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या पक्षाचेच सरकार आहे. त्यांच्या पत्नी आमदार आहेत. त्यांना जर खरोखरच शेतकºयांचा कळवळा असता तर शेतकरी सभासदांना स्वत:च्याच पैशांसाठी उन्हात एटीएमसमोर उभे राहण्याची वेळ आली नसती.भाजपा जिल्हाध्यक्षांनी याबाबत शासनासमोर काय शेतकºयांची बाजू मांडली? वाघ हे किती धुतल्या तांदळाचे आहेत? ते जिल्हा बँकेत संचालक झाल्यावर समजले. बँकेला आवश्यक असलेली छपाईची कामे २००५,०६,०७ मध्ये वाढीव दराने केली. जी कामे आज आॅनलाईन निविदेमुळे तेव्हाच्या दराच्या निम्म्या दरात होत आहेत. ही बाब लक्षात आल्यावर त्यांना काम देणे थांबवली. त्यामुळे बँक वर्ष अखेरीस नफ्यात आली. ही खदखद वाघ यांच्यासह काही नेत्यांना असल्यानेच बँकेची बदनामी करण्याचे उद्योग सुरू आहेत.वाघ यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आपल्यासोबत लोकांसमोर यावे. त्यांनी भोगलेल्या मार्केट सभापतीपद, आमदार स्मिता वाघ यांचा आमदारकीचा व जि.प. अध्यक्षपदाचा कालावधी, या सर्व कालावधीचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्याची तयारी असल्याचे आव्हान अनिल भाईदास पाटील यांनी दिले आहे. त्यामुळे कोण कर्तृत्ववान, आणि कोण भ्रष्टाचारी हे सिद्ध होईल. आणि जरी हे आव्हान वाघ यांनी स्विकारले नाही तरी हे सर्व पुराव्यांसह जनतेसमोर मांडणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
भाजपा जिल्हाध्यक्षांकडून एकनाथराव खडसेंना कमी लेखण्यासाठी बँकेची बदनामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 12:59 PM
अनिल भाईदास पाटील यांचा आरोप
ठळक मुद्देचमचेगिरीसाठी चमकोगिरी! बँकेची बदनामी करण्याचे उद्योग सुरू