जळगाव : नकली सोने तारण म्हणून त्यापोटी साडे आठ लाख रुपयांचे कर्ज घेऊन खामगाव अर्बन को-ऑपरेटीव्ह बँकेची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी ललीत बाळकृष्ण जाधव व त्यांची पत्नी आरती जाधव (रा.जोशी पेठ) यांच्यासह सोने परिक्षक योगेश माधव वाणी (रा.जोशीपेठ) या तिघांविरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मंगळवारी ललीत जाधव याला शहर पोलिसांनी अटक केली.
याप्रकरणी पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ललीत बाळकृष्ण जाधव व त्यांची पत्नी आरती असे दोघे शहरातील दि. खामगाव अर्बन-को ऑपरेटीव्ही बँक शाखा नवीपेठ यांच नियमीत सभासद होते. बँकेच्या सोने तारण कर्ज योजने अंतर्गत ललीत जाधव याने ४ लाख रुपये(२८५.२० ग्रॅम तारण) आणि आरतीने ४ लाख ५० हजार (२८५.६८० ग्रॅम) असे सोने तारण ठेवून ४ एप्रील २०१७ रोजी एकूण ८ लाख ५० हजार रुपये कर्जाची उचल केली. तीन वर्षे या दोघांनी कुठलीही परतफेड केली नाही. म्हणून बँकेने तारण सोने लिलावाचा निर्णय घेतला असता लिलावात हा प्रकार उघड झाला.
सोने परिक्षकाशी हातमिळवणीजाधव दाम्पत्याने सोने तारण ठेवताना बँकेचे अधीकृत सोने परिक्षक योगेश वाणी यांना हाताशी धरुन सोने खरे असल्याबाबतचा अहवाल मिळविला. तो बँकेत सादर करण्यात आला. याच अहवालावर बँकेने सोने तारण ठेवून ८ लाख ५० हजार रुपये रोख कर्ज दिले. हे कर्ज ४ एप्रील २०१८ पर्यंत फेडणे बंधनकारक होते, मात्र दोघांनी एक रुपयाही भरला नाही. बँकेने कर्जदारांना नोटीस पाठविली, परंतु त्यालाही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे बँकेने सोने लिलावासाठी काढले. या सोन्याचे मूल्यांकन नव्या सराफाकडून केल्यावर सर्व सोने नकली असल्याचे निष्पन्न झाले. बँकेचे व्यवस्थापक गोपाळ नामदेव महाले यांनी २० ऑक्टोबर रोजी शहर पोलिसांत तक्रार दिल्यावरुन पती-पत्नीसह खोट्या सोन्याचा अहवाल देणाऱ्या योगेश वाणी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात पुरावे प्राप्त झाल्यानंतर तपासाधिकारी सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल यांनी मंगळवारी ललीत बाळकृष्ण जाधव यास अटक केली. पत्नी आरती व योगेश वाणी या दोघांना अद्याप अटक झालेली नाही.