लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मावळते आर्थिक वर्ष संपत असताना शेवटच्या आठवड्यात २७ मार्च ते २९ मार्चपर्यंत सलग तीन दिवस सुट्या आल्या आहेत. ३० व ३१ मार्च रोजी बँकांचे व्यवहार होऊन पुन्हा १ व २ एप्रिल रोजी हे व्यवहार ठप्प होणार आहे. यामुळे व्यापारी, उद्योजक यांच्यासह सर्वच जणांच्या बँकिंग व्यवहारावर परिणाम होणार आहे.
आर्थिक वर्ष संपत आले म्हणजे सर्वांची बँकिंग व्यवहार पूर्ण करण्याची लगबग असते. त्यात यंदा २७ मार्चपासून सलग तीन दिवस सुट्या आल्या आहेत. इतकेच नव्हे पुढच्या सात दिवसांपैकी केवळ दोनच दिवस बँकांचे कामकाज सुरू राहणार आहे. यात २७ मार्च रोजी चौथ्या शनिवारची सुट्टी आली असून २८ रोजी रविवार आहे. त्यानंतर लगेच २९ मार्च रोजी धुलीवंदनची सुट्टी आहे. ३० व ३१ मार्च रोजी बँकांचे व्यवहार सुरू राहिल्यानंतर १ एप्रिल रोजी नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरत्या आर्थिक वर्षाचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. त्यानंतर २ एप्रिल रोजी गुडफ्रायडेची सुट्टी आहे. ३ एप्रिल रोजी शनिवारी बँकेचे कामकाज होऊन पुन्हा ४ एप्रिलला रविवारची सुट्टी देत आहे.
बँकांना आलेल्या या सलग सुट्ट्यांमुळे अनेकांचे व्यवहार ठप्प होणार आहे. ५ एप्रिलपासून बँकांमध्ये पुन्हा गर्दी वाढण्याची शक्यता आहे.