जळगाव : श्री गणेश चतुर्थीला एकीकडे गणपती बाप्पाच्या स्थापनेची घरोघरी लगबग सुरू होती, तर दुसरीकडे मूर्ती विक्रेते त्यांच्याकडे शिल्लक राहिलेल्या गणेश मूर्तींमुळे चिंतेत होते. अशात त्यांच्यासाठी जणू काही देवदूतच येऊन उभा राहिला. त्याने एक, दोन नव्हे तर चक्क १००८ मूर्तींची खरेदी केली. या मूर्तींची गणेशोत्सवात दररोज पूजा केली जात असून, शनिवारी वाहत्या पाण्यात विसर्जन केले जाणार आहे.
शहरातील काही विक्रेत्यांकडे गणेशमूर्ती शिल्लक राहिल्या होत्या. उद्योजक खुबचंद साहित्या यांनी या मूर्तीकारांकडे कोणत्याही प्रकारे किंमतीची घासाघीस न करता शिल्लक राहिलेल्या सर्व मूर्ती खरेदी केल्या. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी याआधी कधीही गणेशाची स्थापना केलेली नाही. त्यांनी १००८ लहान, मध्यम व मोठ्या मूर्तींची रक्कम त्या-त्या विक्रेत्याला अदा केली. या प्रसंगामुळे काही विक्रेत्यांना अश्रू अनावर झाले. कारण, त्यांनी व्याजावर रक्कमांची उचल केली होती. वॉटरप्रुफ टेंट, वाहतूक इत्यादीवर खर्च झाल्यानंतरचा नफा हा शिल्लक मूर्तींमध्येच होता आणि त्या मूर्ती वर्षभर सांभाळायची, पॅकिंग करुन ठेवायची चिंता होती.
वेगवेगळ्या ठिकाणी संकलन
बळीराम पेठ, शहर पोलीस स्टेशनजवळील परिसर, सिंधी कॉलनी, अजिंठा चौक, आकाशवाणी केंद्रासमोरील रिंग रोड आदी ठिकाणच्या अनेक विक्रेत्यांकडून शिल्लक राहिलेल्या गणेश मूर्ती गुरुवारी, सकाळपासून वातानुकूलित प्रवासी बसमधून संकलित करण्यात आल्या.
१००८ बाप्पांचे दर्शन
संकलित मूर्ती खान्देश मिल कम्पाऊंड परिसरातील संत बाबा हरदासराम मार्केटमधील दुकाने व हॉलमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. पुढील तीन दिवस सकाळ-सायंकाळी आरती केली जाणार असून, शनिवारी दुपारी चार वाजता या सर्व मूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित करण्यात येणार आहेत. तोपर्यंत जळगावकरांना या बाप्पांचे दर्शन घडणार आहे.