चाळीसगावः शुक्रवारी घरोघरी अपूर्व उत्साहात विघ्नहर्ता गणरायाचे वाजत - गाजत आगमन झाले. आरतीच्या मंगलमय स्वरात विधिवत प्रतिष्ठापना केली गेली. शहरात ३२ सार्वजनिक मंडळांनी परवानगी घेतली असून ग्रामीण भागात २८ गावांमध्ये 'एक गाव, एक गणपती' संकल्पना राबविण्यात येत असून ६२ मंडळांनी ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना केली आहे.
आनंदाचे निधान आणि उत्साह आणि मांगल्याचे तेजस्वी पर्व म्हणून गणेशोत्सव साजरा केला जातो. चाळीसगाव परिसरावर यावर्षी पुराच्या नुकसानीचे मोठे सावट आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे तर शहरातही दुकानदारांचे अतोनात नुकसान झाले. शेतीशिवाराची व पशुधनाची अपरिमित हानी झाली आहे. पंचनामे झाले असले तरी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पदरात अजून भरभाई पडलेली नाही. अशाही स्थितीत शुक्रवारी गणेशोत्सवाचा उत्साह दिसून आला. घरोघरी बाप्पांचे मोठ्या उत्साही वातावरणात स्वागत झाले. मोदकांचा नैवेद्य दाखवून पूजाअर्चा केली गेली.
सार्वजनिक मंडळांनीदेखील कोरोनाची सर्व खबरदारी घेऊन बाप्पांचे मनोभावे स्वागत केले. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी अनेक निर्बंध लावण्यात आले आहे. मात्र, तरीही ‘बाप्पा मच्यासाठी काय पण’ म्हणत मंडळांनी सुखकर्ता लंबोदराची प्रतिष्ठापना केली.
.......
चौकट
शहरात ३२ तर ग्रामीण भागात ६२ मंडळे
कोरोना संसर्ग पसरू नये यासाठी गेल्या वर्षाप्रमाणेच सार्वजनिक गणेशोत्सवासाठी नियमावली केली गेली आहे. त्यानुसार शहर व ग्रामीण पोलीस स्थानकामार्फत मंडळांना यापूर्वीच सूचना देण्यात आल्या आहे.
1...ग्रामीण भागात २८ गावांमध्ये सामाजिक व जातीय सलोखा वृद्धिंगत करण्यासाठी ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पना राबवण्यात आली आहे. येथे शुक्रवारी गणरायाची स्थापना केली गेली. एकूण ६२ मंडळांनी परवानगी घेतली असून सर्वत्र कडक पोलूस बंदोबस्त असणार आहे, अशी माहिती ग्रामीण पोलीस स्थानकाचे पो. नि. संजय ठेंगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
.....
चौकट
शहरात ३२ मंडळे, पथसंचलनही झाले.
शहरात ३२ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी परवानगी घेतली आहे. विधिवत येथे गणपती बाप्पांचे आगमन झाले असून गुरुवारी शहरातून सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातून पोलिसांनी पथसंचलन केले. दंगा काबू पथकही यात सहभागी झाले होते.
1...शहरातील ३०० उपद्रवींना नोटिसा बजावल्या आहेत. सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे. नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळावेत, गर्दी करू नये, असे आवाहन शहर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी 'लोकमत'शी बोलताना केले.