लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : औद्योगिक वसाहत परिसरातील काशिनाथ चौकाकडून गुरांच्या बाजाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुभाजकाच्या जागेवर बॅरीकेड्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतुक काही प्रमाणात सुरळीत करण्याचा प्रयत्न शहर वाहतुक शाखेतर्फे करण्यात आला आहे. मात्र त्यासोबतच काही नवीन प्रश्न उभे राहिले आहेत.
औद्योगिक वसाहतीत काशिनाथ चौक हा वाहतुक कोंडीचे ठिकाण बनला आहे. औरंगाबादला जोणारा हा रस्ता, मेहरुण ते गुरांचा बाजार असा रस्ता या चौकात एकत्र येतात. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती देखील तेथे असल्याने तेथे वाहतुकीचे नियोजन करणे कठीण आहे. त्यातच या चौकात सिग्नल नाही. महामार्ग असून देखील समांतर रस्त्यांचा पर्याय नाही. त्यामुळे येथे वाहतुकीची मोठी कोंडी कायमच होते. त्यातच ढोर बाजाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ मोठे कंटेनर असतात. हे कंटेनर नियम मोडून पुर्ण रस्ता व्यापून टाकतात. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता असते. त्यावर उद्योजकांनी सातत्याने तक्रारी केल्या. आता अखेर वाहतुक शाखेने येथे लोखंडी बॅॅरीकेड्स लावले आहेत. त्यामुळे वाहतुक काही प्रमाणात सुरळीत होणार असली तरी नवे प्रश्न उभे राहिले आहेत. या ठिकाणी रात्री बऱ्याचदा पथदिवे बंद असतात. त्यामुळे वाहन धारक या बॅरीकेड्सला धडकण्याची शक्यता आहे. तसेच गर्दीच्या वेळी बहुतेकवेळा येथे वाहतुक पोलीस देखील नसतात. शनिवारी सायंकाळी येथे वाहतुक पोलीस उभे होते. मात्र दुपारच्या वेळी येथे वाहतुक पोलीस नसतात.
अतिक्रमणांचा प्रश्न कायम
या रस्त्यावर वाहतुक कोंडी होण्यासाठी अतिक्रमण मोठे कारण ठरते. मात्र त्यावर कोणताही पर्याय काढण्यात आलेला नाही. लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यानंतर या रस्त्यावर अतिक्रमण वाढण्यास सुरूवात झाली. अजिंठा चौकापासून थेट एमआयडीसीच्या कार्यालयापर्यंतच्या चौकात हे अतिक्रमण आहे. येथे फळे, भाज्या, कपडे, चप्पल बुट, खेळणी यापासून अनेक वस्तुंचे विक्रेते बसलेले असतात. खरेदीसाठी वाहनधारक येथे थांबतात. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो. तसेच हे विक्रेते थेटरस्त्यावर येऊन देखील विक्री करतात.