जळगाव : महाराष्ट्र पोलिसांच्या गणवेशात एका अतिरिक्त बेसबॉल टोपीचा (फटींग कॅप) समावेश करण्यात आला आहे, त्यामुळे आता पोलीस शिपाई ते सहायक फौजदार यांची टोपी अधिकाऱ्यांच्या टोपीसारखी मिळती जुळती राहणार आहे. या टोपीमुळे पोलीसही रुबाबदार दिसू लागले आहेत.जळगाव पोलीस दलात ही टोपी दाखल झाली आहे.
पोलिसांच्या गणवेशात या टोपीचा समावेश करण्याचे आदेश पोलीस महासंचालक एस.के.जायसवाल यांनी दिले आहेत. सध्या वापरात असलेल्या टोपीचा वापर फक्त परेडसाठी होणार आहे. कायदा व सुव्यवस्थेचा दैनंदिन वापर व बंदोबस्तावर असताना नवीन समाविष्ट केलेल्या बेस बॉल टोपीची पकड घट्ट असते.कर्तव्य पार पाडताना ती डोक्यावरुन पडण्याची शक्यता नसते. त्याशिवाय या टोपीमुळे उन्हापासून चेहऱ्याचेही संरक्षण होत असल्याने या टोपीचा अतिरिक्त टोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे.
नवीन टोपीबाबत पोलीस महासंचालकांचे आदेश आहेत. त्यानुसार जिल्हा पोलीस दलात शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षक पर्यंतच्या कर्मचाऱ्यांना दैनंदिन वापरासाठी नवीन टोपी देण्यात येत आहे. -डॉ.पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक, जळगाव.