लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील बेसमेंट पार्कींग बाबतच्या आदेशांवरील कारवाईबाबात आंदोलनाचा इशारा दिलेले माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांच्यासोबत उपायुक्त प्रशांत पाटील आणि उपायुक्त संतोष वाहुळे यांनी रविवारी सकाळी चर्चा केली. मात्र, कारवाईचे अधिकार हे आयुक्तांना असल्याचे त्यांना सांगण्यात आले असून आंदोलनापुर्वी दीपक गुप्ता पुन्हा आयुक्त सतिष कुलकर्णी यांच्याशी सकाळी दहा वाजता चर्चा करणार आहेत.
शहरातील ४६३ जणांनी बेसमेंट पार्कींगचे नियम झुगारून बांधकाम केले आहे. त्यांना दोन वर्षांपूर्वी नोटीसाही देण्यात आल्या होत्या. यात अनेक बड्या लोकांचा समावेश आहे. दोन वर्ष उलटूनही ठोस कारवाई होत नसल्याने गुप्ता यांनी याबाबत वारंवार तक्रारही दिली होती. यातील ३६ प्रकरणात कारवाईचे आदेश आहेत. मात्र, तरीही कारवाई होत नसल्याने अखेर गुप्ता यांनी सोमवार ७ डिसेंबर रोजी आयुक्तांच्या दालनासमोर सकाळी ११ ते ५ एकदिवसीय ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने उपायुक्तांनी गुप्ता यांना रविवारी चर्चेसाठी बोलावले होते. गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार बेसमेंट पार्कींग आणि सकारण आदेशांबाबत दोघाही उपायुक्तांनी कारवाईबाबत हतबलता दाखवत कारवाईचे अधिकार हे आयुक्तांना असल्याचे सांगितले. असे आदेश काढल्यानंतर साधारण त्याची अंमलबजावणी किती दिवसांनी होते, अशी विचारणा गुप्ता यांनी केल्यानंतर सात दिवसात अंमलबजावणी होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, बेसमेंट पार्कींग प्रकरणात आदेश देऊन दोन वर्ष उलटल्याचे गुप्ता यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, आयुक्तांकडे दहा मुद्दयांबाबत माहिती मागितली असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.
शिवसेनेचा इशाऱ्याला दहा दिवस
या प्रकरणात महापालिकेचे विरोधीपक्ष नेते सुनील महाजन यांनी सात दिवसात कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, याला दहा दिवस उलटूनही शिवसेनकडून नंतर कुठलाही आवाज उठविण्यात आला नसल्याने हा इशारा हवेत विरल्याचे बोलले जात आहे.