ऑनलाइन लोकमत / प्रमोद ललवाणी कजगाव, जि. जळगाव, दि. 23 - सध्याच्या काळात मुलींची संख्या कमी असल्याने विवाह ठरवताना वधूपक्षास ‘भाव’ दिला जात असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी तर पैसे देवून मुली सून म्हणून आणल्या जातात. अशा काळातही एका सुंदर मुलीने दिव्यांग मुलाचा आयुष्याचा जोडीदार म्हणून स्वीकार करीत त्याला आधार दिला आणि त्याच्या आयुष्याची ‘रक्षिता’ बनून एक आदर्श उभा केला आहे. या कौतुकास्पद विवाहाबाबत माहिती अशी की, कजगावचे व्यापारी कल्याणमल धाडीवाल यांना तीन मुली व एक मुलगा आहे. तीनही मुलींचे लग्न झाले. विकी धाडीवाल हा एकच मुलगा. तो एक पाय व एका हाताने दिव्यांग असल्याने विवाह जुळविण्यात अडचणी येत होत्या. वडील कल्याणमल धाडीवाल, आई रेखा व तिन्ही बहीणीसह मेहुण्यांनी दोन वर्षापासून त्याच्या लग्नासाठी प्रय} सुरू केले होते. इतर समाजातही स्थळ पाहणे सुरू होते. मालेगाव जि.नाशिक येथील धाडीवाल यांचे जावई कल्पेश छाजेड व संदीप छाजेड यांना मालेगाव येथील पाटील कुटुंबाबाबत माहिती मिळाली आणि त्यांनी विवाहाचा प्रस्ताव या कुटुंबाकडे ठेवला. पाटील कुटुंबाची स्थिती साधारणच. यामुळे अॅड.श्यामकांत डी.पाटील, मुलीचे मामा ऋषीकेश पाटील, आजोबा विठ्ठल पाटील, आई वैशाली यांच्याशी चर्चा केली. मुलाची परिस्थिती चांगली आहे पण तो दिव्यांग आहे, याची जाणीव उपवर प्रांजलला करून दिली. प्रांजलनेही मोठय़ामनाने ती बाब स्वीकारुन या स्थळासाठी होकार दिला. मुला-मुलीचा पाहण्याचा कार्यक्रम सुरू असताना काही नातेवाईकांनी विकीला चालण्यास सांगितले असता चालताना त्याच्या वेदना प्रांजलला जाणवल्या व तिने त्वरित तिच्या वडिलांना प्रश्न केला की बाबा या जागेवर जर मी दिव्यांग असते आणि असे जर मला चालायला सांगितले असते तर तुम्हास किती वेदना झाल्या असत्या. या प्रश्नाने तेथील उपस्थित चकीत झाले व लग्नाचा होकारही निश्चित होऊन हा विवाह सोहळा पाचोरा येथे 500 जणांच्या उपस्थितीत पार पडला. प्रांजलने दिला विकीला आधारशहनाईच्या सुरात वर-वधूचे आगमन झाले. वर-वधू स्टेजकडे जाताना प्रांजलने विकीचा हात हातात घेत त्याला आधार देत स्टेजवर नेले. मंगलाष्टक सुरू झाले आणि विकीच्या हाताला आधार देत प्रांजलने वरमाळा आपल्या गळयात घातली.प्रांजलची बनली रक्षितामुलाचे वडील कल्याणमल व आई रेखा यांनी आता विकीची रक्षा करणारी व त्याची काळजी वाहणारी म्हणून प्रांजलचे नाव ‘रक्षिता’ असे ठेवल्याचे सांगितले.
दिव्यांग वराला वधू ‘रक्षिता’चा आधार
By admin | Published: April 23, 2017 1:18 PM