आनंद सुरवाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील ७७९ ग्रामपंचायतींमधील विविध अपहाराची चार कोटींपेक्षा अधिक रक्कम गेल्या अनेक वर्षांपासून वसूल झालेली नाही. अशातच आता ही वसुली संबंधितांकडून मिशनमोडवर तालुकास्तरावर कॅम्प लावून करावी, अशा सूचना उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. आर. लोखंडे यांनी दिल्या आहेत. वसुली नसल्याने बीडीओंना नोटीस बजावण्यात येणार आहे.
विविध योजना, वित्त आयोग, पाणी योजना अशा विविध योजनांमध्ये ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या गैरव्यवहारानंतर प्राप्त तक्रारींवर लेखापरीक्षण करून संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्याकडून ही रक्कम वसूल करण्याच्या सूचना होत्या. मात्र, ही रक्कम टप्प्याटप्याने काही प्रमाणातच वसूल करण्यात आली. यातील ४५ लाखांची वसुली ही २०१६ ते २०१७ मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर यात कुठलीही प्रगती झाली नाही. नंतर हा पूर्ण कार्यभार थंड बस्त्यात होता. त्यामुळे आता ही रक्कम तातडीने वसूल करा, अन्यथा कारवाई, अशा स्वरूपात गटविकास अधिकारी यांना नोटीस बजावण्यात येणार आहे.
तर ग्रामसेवकांवर गुन्हे
गैरव्यवहार प्रकरणांचा अगदी बारकाईने अभ्यास करण्यात येत असून, आता यात ग्रामसेवकांवर गुन्हे दाखल होण्याचेही संकेत मिळत आहेत. गैरव्यवहारांच्या प्रकरणात विस्तार अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांनी आता कॅम्प लावून तालुकास्तरावर ही वसुली करण्याच्या सूचना आहेत. शिवाय सीईओ डॉ. पंकज आशिया यांनीही तक्रारींचा निपटारा अगदी सात दिवसांच्या आत करण्याच्या सूचना दिल्याने कामाला वेग येणार आहे.
तालुकानिहाय प्रलंबित वसुली
अमळनेर : ७० लाख १७ हजार
भडगाव : ७७ लाख ४१ हजार
भुसावळ : ३४ लाख ७४ हजार
बोदवड : ३२ लाख ३ हजार ६९५
चोपडा : ३७ लाख ५९ हजार १०
चाळीसगाव : ५३ लाख ८२ हजार २२४
एरंडोल : १४ लाख ३ हजार ९६३
धरणगाव : ३४ लाख ७० हजार५२४
जळगाव : ६० लाख ६८ हजार ९९३
जामनेर : ४४ लाख ८१ हजार २५४
पाचोरा : ३७ लाख ७ हजार ८११
पारोळा : १९ लाख ४६ हजार२१८
मुक्ताईनगर : ३० लाख २५ हजार५४२
रावेर : २२ लाख ७४ हजार ६९९
यावल : ४ लाख ६९ हजार ४५७