मनपातर्फे शहरातील सर्व रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम हाती घेतली असून, कारवाईदेखील सुरू करण्यात आली आहे. यामध्ये नेहरू पुतळ्यापासून
ते टॉवर चौक, फुले मार्केट परिसर, घाणेकर चौक, सुभाष चौक, सराफ बाजार व जुन्या बसस्थानक परिसरातील रस्ते कायमस्वरूपी अतिक्रमणमुक्त
करण्यावर भर दिला आहे. येथील अतिक्रमण हटविण्याबरोबरच मनपाने या बाजारपेठ परिसरातील रस्त्यांवर कार पार्किंग करणाऱ्यांवर कारवाईचा निर्णय
घेतला आहे. वाहतूक विभागाच्या मदतीने लवकरच वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या रस्त्यावर पार्किंग केलेल्या कार चालकांवर दंड ठोठावण्यात येणार
आहे. जर कारवाई करतेवेळी कारमालक जागेवर नसेल, तर संबंधित वाहनाला `जॅमर` लावण्यात येणार आहे. दंड भरल्यावरच वाहन सोडण्यात येणार
असून, चारचाकीसह दुचाकी वाहनांवरही कारवाई करण्यात येणार आहे.
इन्फो :
मनपाच्या पार्किंगचा वापर करण्याचे आवाहन
बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या चारचाकी वाहनधारकांनी जुन्या नगरपालिकेची जागा व जुन्या साने गुरुजी रुग्णालयाच्या जागेवर सुरू करण्यात
आलेल्या पार्किंगवर वाहन लावणे गरजेचे आहे. ही सुविधा वाहनधारकांसाठीच करण्यात आली असतांना, अनेक वाहनधारक
रस्त्यावर वाहने पार्किंग करत असल्यामुळे कोंडी उद्भवत आहे. त्यामुळे वाहनधारकांनी कारवाई टाळण्यासाठी मनपाच्या पार्किंगचा
वापर करण्याचे आवाहन उपायुक्त संतोष वाहुळे यांनी केले आहे.