लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाने साठेबाजी रोखण्यासाठी काही उपाययोजना केल्या आहेत. आणि त्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील केमिस्ट बांधवांना दिले आहेत. त्यात रेमडेसिवीर, टोसॅलिझुमॅब, इटोलीझुमॅब ही इंजेक्शन डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय न देण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, होलसेल औषधी डिलर्स, औषध विक्रेते यांच्याकडून रेमडेसिवीर, टोसॅलिझुमॅब, इटोलीझुमॅब या औषधांचा पुरवठा प्राधान्याने शासकीय कोविड हॉस्पिटल तसेच जिल्हा शल्य चिकित्सक जळगाव यांच्याकडून कोविड १९ उपचारासाठी मान्यता दिलेल्या खासगी हॉस्पिटल्स, परवानाधारक औषध विक्रेते आणि शासनाच्या नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायी यांनाच करावा. शासनमान्य नोंदणीकृत वैद्यकीय परवानाधारक डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खासगी व्यक्तींना ही औषधे देऊ नयेत. या औषधांची कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही याबाबतची दक्षता होलसेल औषधी डिलर्स आणि औषध विक्रेता यांनी घ्यावी. तसेच या आदेशाचे पालन होत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी अन्न आणि औषध प्रशासनावर निश्चित करण्यात आली आहे.