रावेर, जि.जळगाव : शहराला लागलेला दंगलीचा डाग आपल्या नागरिकत्वाचे भान ठेवून व दुरोगामी परिणामांची जाण ठेवून सण उत्सव शांततेत व काळजीपूर्वक साजरे करा. रावेर शहराला दंगलीकडून मांगल्याकडे नेण्यासाठी कटिबद्ध राहा, असे प्रतिपादन नव्याने रूजू झालेले पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी केले. रावेर पोलीस ठाण्यातर्फे आयोजित शांतता समितीच्या सभेत ते बोलत होते.प्रारंभी सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले. दरम्यान नगराध्यक्ष दारा मोहंम्मद, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, निवासी नायब तहसीलदार कविता देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, उपनगराध्यक्ष अॅड.सुरज चौधरी, नगरसेवक असदुल्ला खान, महावितरणचे कििनष्ठ अभियंता योगेश पाटील, रवींद्र महाजन, फौजदार दीपक ढोमणे यांचे पोलिस स्टेशनतर्फे स्वागत करण्यात आले. दरम्यान, सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांची बदली झाल्याने नगराध्यक्ष दारा मोहंम्मद यांच्याहस्ते त्यांना निरोप देण्यात आला.यावेळी मनोगतात अॅड.एम.ए.खान यांनी शहराच्या जातीय सलोख्याचा गौरव करून पोलिस स्टेशन आपण दुसऱ्याच्या निर्णयातून नव्हे तर स्वयं निर्णयातून पोलीस ठाणे चालवण्याची मागणी केली. पिंटू महाजन यांनी नागझिरी विसर्जन कुंडाची स्वच्छता करण्याची सुचना केली. मुस्लिम पंच कमिटीचे गयास शेख यांनी मिरवणूक मार्गावरील वीज संयोजन व केबल नेटवर्कच्या वायरींची उंची उंचावण्याची मागणी केली. मुख्याधिकारी रवींद्र लांडे म्हणाले सण उत्सवातील प्रेरणा महत्वाची आहे. दंगलीची ओळख मिटण्याची तमाम नागरीकांची जबाबदारी आहे. गणेशोत्सव व मोहर्रम सणानिमित्त सोयीसुविधांची उपाययोजना करण्यात येतील.यापुढे बोलताना पोलीस वाकोडे म्हणाले, गुंडांवर वचक ठेवण्यासाठीच पोलीस असून जेजुरी पोलिसात गुंडांवर मोक्का लावणारा पहिला अधिकारी असून गुन्हेगारी शून्यावर आणण्यात यश आणल्याचे स्पष्ट करून गुंडांबाबत माहिती द्या. त्यांच्यावर वचक आणण्याची आमची जबाबदारी आहे. गुन्हेगारी जगताकडे वळणारी मुलांना परावृत्त करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी माजी नगराध्यक्ष हरीश गणवानी, गयास शेख, युसूफ खान दिलीप कांबळे, नगरसेवक सुधीर पाटील, सादीक शेख, अॅड.योगेश गजरे, राजेश शिंदे, अॅड.लक्ष्मीकांत शिंदे, श्रीकांत भोकरीकर, डी.डी.वाणी, डॉ.संदीप पाटील, पोलीस पाटील लक्ष्मीकांत लोहार, अश्फाक शेख, गोपाळ चौधरी, एमआयएमचे वसीम शेख, दिलीप शिंदे आदी उपस्थित होते. आभार फौजदार दीपक ढोमणे यांनी मानले.
रावेर शहराला दंगलीकडून मांगल्याकडे नेण्यासाठी कटिबद्ध राहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2018 12:51 AM