लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आगामी मान्सुनच्या कालावधीत जिल्ह्यात आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवल्यास यंत्रणांनी समन्वय ठेऊन परिस्थिती हाताळण्यास सज्ज रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. तसेच त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना सुचना देखील केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मान्सून पूर्व आढावा बैठक जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेत पार पडली. त्यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरविरसिंह रावळ हे उपस्थित होते. तर जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांचेसह विविध विभागांचे अधिकारी व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते.
राऊत यांनी सांगितले की, महसुल विभागाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा, शोध व बचाव साहित्याची तपासणी करुन सर्व साहित्य सुस्थितीत ठेवावे, पुरेसा धान्यसाठा व वितरणाचे नियोजन करावे. अंत्योदय योजनेतंर्गत लाभार्थ्यांना मान्सुन काळात धान्य पुरवठ्याचे नियोजन करावे. आरोग्य विभागाने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांसाठीच्या औषधांचा पुरेसा साठा करावा. पाटबंधारे विभागाने धरणनिहाय आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करुन पुररेषा निश्चित करावी. धरणातून विसर्ग सुरु करणार असल्यास त्याबाबतची माहिती यंत्रणेद्वारे द्यावी, बांधकाम विभागाने रस्ते, पुल, पाझर तलाव यांची पाहणी करावी, नगरपालिकांनी अग्निशमन यंत्रणा सज्ज ठेवावी, वीज वितरण कंपनीने धोकादायक पोल, उघडे ट्रान्सफार्मर दुरूस्त करावे, अशा सुचनाही देखील त्यांनी दिल्या.