अमित महाबळ, जळगाव: महाराष्ट्र राज्य नेत्ररोग तज्ञ संघटना, जळगाव जिल्हा नेत्ररोग तज्ञ संघटना व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नेत्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मधुमेहामुळे डोळ्याच्या मागच्या पडद्यावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत मंगळवारी, सकाळी जनजागृतीपर रॅली काढण्यात आली. यावेळी मधुमेहामुळे डोळ्यांवर होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात केली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापासून पांडे चौक, स्वातंत्र्य चौक, बस स्टॅण्डमार्गे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रॅलीचा समारोप करण्यात आला. याप्रसंगी जळगाव जिल्हा नेत्ररोग तज्ञ संघटनेच्या अध्यक्षा डॉ. रागिणी पाटील, सचिव डॉ. चेतन पाटील, डॉ. अनुप येवले, उल्हास कोल्हे, डॉ. वृषाली पाटील, डॉ. नयना पाटील, डॉ. पंकज शहा, वैद्यकीय महाविद्यालयाच्या नेत्र विभागातील निवासी डॉक्टर, आंतरवासिता डॉक्टर, नर्सिंगच्या विद्यार्थिनी आदी उपस्थित होते. नेत्ररोग तज्ञ तथा अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
२७ पासून विशेष मोहीम, रेटिनाची होणार मोफत तपासणी
मधुमेहामुळे डोळ्यांवर होणाऱ्या दुष्परिणामांची मोफत तपासणी दि. २७ ते २९ या दरम्यान नेत्ररोग तज्ज्ञांकडे केली जाणार आहे. डॉ. श्रुती चांडक, डॉ. धर्मेंद्र पाटील, डॉ. चेतन पाटील, डॉ. मोहित भारंबे, डॉ. अनुप येवले, डॉ. अंकुश कोल्हे यांचा या उपक्रमात सहभाग आहे. रुग्णांनी पूर्वनोंदणी, वेळेच्या माहितीसाठी तारखेपूर्वी तपासणीच्या ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन जळगाव नेत्ररोग तज्ञ संघटनेचे सचिव डॉ. चेतन पाटील यांनी केले आहे.
ही काळजी घ्या....
जळगाव शहरातील व्हिट्रीओ रेटीनल सर्जन डॉ. निलेश चौधरी यांनी डोळ्याच्या मागच्या पडद्यावर मधुमेहामुळे होणारे दुष्परिणाम कसे टाळता येतील यावर मार्गदर्शन केले. रक्तातील साखरेचे तीन महिन्यात सरासरी प्रमाण १५० ते १७५ च्या आत हवे, रक्तदाब नियंत्रणात असावा, धुम्रपान व अधिक कोलेस्ट्रॉल असलेले खाद्यपदार्थ टाळणे, डोळ्यांची वर्षातून एकदा नियमित तपासणी, नियमित व्यायाम करण्याचे आवाहन करण्यात आले.