जळगाव : दर महिन्याला हप्ता द्यावा म्हणून हॉटेल मालकाला पाच ते सहा जणांनी मारहाण करून हॉटेलची तोडफोड केली होती. ही घटना १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता पाळधीतील हॉटेल साईनाथ येथे घडली होती. या प्रकरणी अखेर हॉटेल मालक किरण त्र्यंबक नन्नवरे (रा. सिध्दार्थनगर, पाळधी खुर्द) यांच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पाळधी खुर्द येथे किरण नन्नवरे हे कुटूंबियांसह वास्तव्यास आहे. त्यांचे पाळधी येथे साईनाथ नावाने हॉटेल आहे. १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी राहुल सपकाळे (रा. बांभोरी) हा तरूण चार ते पाच जणांसोबत जेवणासाठी साईनाथ हॉटेलवर आला होता. जेवण आटोपल्यानंतर नन्नवरे यांनी त्यांच्याकडे जेवणाचे पैसे मागितले़ कसले पैसे म्हणत राहुलने वाद घालण्यास सुरूवात केली. नंतर हॉटेल मालक नन्नवरे यांना मारहाण केली. त्यातच राहुल व त्याच्यासोबत असलेले पद्माकर नन्नवरे, सोपान नन्नवरे, संदीप नन्नवरे, रुस्तम नन्नवरे व राजु सपकाळे यांनी दहा हजार रूपये महिन्याला हप्ता द्यावा अन्यथा हॉटेल बंद पाडू असे म्हणत किरण नन्नवरे यांना पुन्हा मारहाण करून हॉटेलची तोडफोड केली होती. मारहाणीत जखमी झालेले नन्नवरे यांना रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. अखेर उपचार घेतल्यानंतर त्यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार राहुल सपकाळे, पद्माकर नन्नवरे, सोपान नन्नवरे, संदीप नन्नवरे, रुस्तम नन्नवरे व राजु सपकाळे (रा़ बांभोरी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, संशयितांना अटक करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.