अजय पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : लॉकडाऊनमुळे नागरिक आता घरात राहून कंटाळलेले आहेत. त्यात बाहेर जिल्ह्यात जाण्यासाठी अनेक निर्बंध अजून कायम आहेत. मात्र, पावसाळ्यात निसर्ग पर्यटनासह जंगलातील थ्रिल अनुभवण्यासाठी सातपुड्याच्या पायथ्यालगत असलेल्या निसर्गरम्य ठिकाणी जळगावकराना जाता येणार आहे.
आता कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाला यश आले आहे. वन विभागाने देखील जिल्ह्यातील सातपुड्यातील वनपर्यटनासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे पावसाळ्यात विविध पर्यटनस्थळांवर जाण्याचा मार्गदेखील मोकळा झाला आहे. आता या पावसाळ्यात सह्याद्रीतील ट्रेकिंगचा थ्रिल जिल्ह्यात कसा भेटेल? असा प्रश्न वाचकांना पडत असेल, तर जिल्ह्यातील अशा ठिकाणांची माहिती आपल्याला ‘लोकमत’ करून देत आहे.
चिंचपाणी
सातपुड्याच्या पायथ्याशी चोपडा तालुक्यातील बीडगावपासून ४ किमी अंतरावर हे ठिकाण आहे. चिंचपाणी ठिकाणी लहान धरण तयार करण्यात आले आहे. पावसाळ्यात हे धरण भरल्यानंतर याठिकाणचा निसर्ग पाहण्यासारखा असतो, तसेच या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील अनेक लहान-मोठे धबधबे असल्याने याठिकाणीही भिजण्याचा आनंद पर्यटक घेऊ शकतात.
कसे जाणार - जळगाव शहरापासून अवघ्या ३४ किमी अंतरावर हे ठिकाण आहे. चोपडा तालुक्यातील धानोऱ्याला गेल्यानंतर त्याठिकाणाहून बीडगावमार्गे चिंचपाणीला जाता येते.
निंबादेवी डॅम
हे ठिकाण यावल तालुक्यातील किनगावपासून ११ किमी अंतरावर आहे. हे ठिकाण म्हणजे जळगाव जिल्ह्यातील भुशी डॅम आहे. भुशी डॅम भरल्यानंतर पायऱ्यांवरून वाहणाऱ्या पाण्यात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी लोणावळ्याला जाण्याची गरज नाही. याठिकाणी निंबादेवीचे देखील मंदिर आहे.
कसे जाणार - जळगाव शहरातून विदगाव, डांभुर्णीमार्गे किनगावला पोहोचल्यानंतर वाघझिरा या गावी जाऊन त्याठिकाणाहून पाच किमी जंगलातून गेल्यानंतर याठिकाणी जाता येते.
चौगावचा किल्ला
चोपडा येथून अवघ्या ११ किमी अंतरावरील चौगावचा किल्ला सुमारे ७०० वर्षे जुना किल्ला आहे. या किल्ल्याला विजयदुर्गदेखील म्हणतात. याठिकाणी सातपुड्यातून आलेल्या तीन झऱ्यांचा संगम होत असतो. याठिकाणी काही प्राचीन लेण्या व महादेवाचे जुने मंदिर आहे.
कसे जाणार - चोपडा येथून सुंदरगढीकडून लासूर रस्त्याला चौगाव येथे जाता येते. चौगावहून पायपीट करून, किल्ल्यापर्यंत जाणे सहज शक्य आहे.
वाघझिरा
किनगावपासून हे ठिकाण अवघ्या ५ किमी अंतरावर आहे. याठिकाणी किर्र जंगलाचा अनुभव या ठिकाणी घेता येतो. सातपुड्याच्या पायथ्यापासून ते कुशीपर्यंत या ठिकाणी जाता येते. सातपुड्यातून येणाऱ्या नद्या व त्याठिकाणी असलेले लहान-मोठे धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात.
कसे जाणार - जळगाव शहरातून विदगाव, डांभुर्णीमार्गे किनगावला पोहोचल्यानंतर वाघझिरा या गावी जाऊन त्याठिकाणाहून १ किमी जंगलातून गेल्यानंतर याठिकाणी जाता येते.
मनुदेवीचा गायवाडा
मनुदेवी हे ठिकाण जळगावकरांना नेहमीचेच परिचित आहे. मात्र, मनुदेवी मंदिराच्या वरच्या भागात असलेल्या गवळी राजाचा पुरातन किल्ला आणि गायवाड्याबाबत फार काही माहिती नाही. मनुदेवी मंदिराच्या वरच्या भागात मोठा पर्वत पार केल्यानंतर १३०० च्या काळात गवळी राज्याने बांधलेल्या किल्ल्याचे अवशेष आहेत. अल्लाउद्दीन खिल्जी जेव्हा महाराष्ट्रात दाखल झाला. तेव्हा त्याने पहिल्यांदाच गवळी राजाच्या किल्ल्यावर आक्रमण केले होते. या आक्रमणाच्या जखमा आजही या किल्ल्याच्या अवशेषांमधून दिसून येतात.
याठिकाणी देवू शकतात भेट
वरील ठिकाणांसह पाल अभयारण्यदेखील चांगले ठिकाण आहे. अनेर डॅम, लंगडा आंबा, चारठाणा, अंबापाणी या ठिकाणांवरदेखील जाऊन आपला वीकेंड साजरा करू शकतात.