लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना काळात नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बाधित रूग्णांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांची घरबसल्या माहिती मिळावी यासाठी महानगरपालिकेत वॉररूम सुरू करण्यात आले आहे. तीन शिफ्टमध्ये हेल्पलाईन सुरू होणार आहे. यात शहरातील ट्रेसिंग, टेस्टिंग, बेडची व्यवस्था आदी माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. विशेष म्हणजे गृह विलगिकरणातील रूग्ण बाहेर फिरत असल्यास हेल्पलाईनवरून तक्रार करता येईल.
कोरोनाचा कहर वाढला आहे. रूग्ण संख्या सतत एक हजाराच्यावर येत आहे. जिल्ह्यातील रूग्णांसाठी प्राधान्याने उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्रपणे वॉररूम कार्यान्वीत आहे. परंतु महापालिका क्षेत्रातील रूग्णांना देखिल घरबसल्या जागेवर संपुर्ण माहिती मिळावी अशा सुचना पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत केल्या होत्या. त्यानुसार आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी आरोग्य विभागांतर्गत वॉररूम कार्यान्वीत करण्याचे आदेश दिले आहेत.
तीन शिफ्टमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती
मनपात वॉर रूम कार्यान्वीत करण्यात आले असून सोबत टोल फ्री सुध्दा जारी करण्यात आला आहे. तसेच वॉर रूमच्या नोडल अधिकारी म्हणुन आनंद चांदेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरीकांच्या सोयीसाठी टोली फ्री क्रमांक २४ तास सुरू राहणार आहे. १८००२३३८५१० असा टोली फ्री क्रमांक आहे. सकाळी ८ ते दुपारी ४ पहिली शिफ्ट असेल. त्यानंतर दुपारी ४ ते रात्री १२ वाजेपर्यंत दुसरी शिफ्ट तर रात्री १२ वाजेपासून सकाळी ८ वाजेपर्यंत तिसरी शिफ्टमध्ये प्रत्येकी एक कर्मचारी कार्यरत राहतील.
बाहेर फिरणाऱ्या रूग्णांवर असणार नजर
पालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये दररोज किती रूग्ण दाखल आहेत. किती बेड शिल्लक आहेत. किती रूग्णांना गृह विलगीकरणाची परवानगी दिली आहे, याची संपुर्ण माहिती नागरीकांना हेल्पलाईनवरून मिळणार आहे. याशिवाय गृह विलगिकरणातील रूग्ण बाहेर फिरत असल्यास नागरीकांच्या तक्रारीची दखल घेऊन संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांना कळविण्याचे काम केले जाणार आहे.