फैजपूर, ता.यावल, जि. जळगाव : सावदा वाघोदा रोडवरील हिना पॅलेस बीअर बार व परमिट रूम अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातून तब्बल पाच लाखांची विदेशी दारू व बियरच्या बाटल्या दारू लंपास केल्याची घटना ३० रोजी उघडकीस आली. या घटनेने खळबळ उडाली असून या चोरी मागील रहस्य काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.रावेर वाघोदा रस्त्यावरील पेट्रोलपंपाशेजारी हिना पॅलेस बीअर बार व परमिट रूम आहे. सध्या लॉकडाउनमुळे बिअरबार, परमिट रूम हे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सील करण्यात आले आहे. तसेच हिना बारसुद्धा सील करण्यात आले होते. मात्र दि. २९ च्या मध्यरात्री हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या दरवाज्याला सील असतानासुद्धा अज्ञात चोरट्यांनी लोखंडी चैनल गेटची कडी कापून हॉटेलमध्ये प्रवेश केला. त्यातून चार लाख ६७ हजार ४०० रुपयाची विविध कंपन्यांची विदेशी दारू व बिअरच्या बाटल्या तसेच डीव्हीआर चोरून नेला. ही घटना दि.३० रोजी उघडकीस आली. या घटनेप्रकरणी हॉटेल मॅनेजर कृष्णा सुधाकर गोष्टी यांनी खबर दिलली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी मुक्ताईनगरचे डीवायएसपी सुरेश जाधव यांनी भेट देऊन पाहणी केली, तर राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी यांनीसुद्धा घटनास्थळी भेट देऊन स्टॉक रजिस्टर चेक केल्यानंतर हॉटेलमधून चार लाख ६७ हजार ४०४ देशी, विदेशी दारूच्या तसेच बिअरच्या बाटल्या चोरी झाल्याची माहिती समोर आली. या घटनेचा तपास सपोनि राहुल वाघ करीत आहे.दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सावदा तसेच परिसरात मोठ्या प्रमाणावर देशी विदेशी दारूची अवैध विक्री होत आहे. हा माल येतो कुठून याचीही पोलिसांनी कसून चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. तसेच या चोरी मागे काही गौडबंगाल तर नाही, असाही संशय नागरिकांमधून व्यक्त होत आहे. ही दारू सद्य:स्थितीत अवैधरित्या विकली गेली असल्यास तिची किंमत १५ ते२० लाखाच्या जवळपास असल्याचे समजते.दरम्यान, राज्य उत्पादन शुल्कचे के.एन. बुवा यांच्या पथकाने तपासणी केली.