लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिका प्रशासनाने मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांना नुकसानभरपाईची चालन भरण्याबाबत नोटिसा बजावल्यानंतर गाळेधारकांनी शुक्रवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. संपाच्या सहाव्या दिवशी श्यामाप्रसाद मुखर्जी व्यापारी संकुलातील गाळेधारकांनी बुधवारी मनपा प्रशासनाविरोधात अर्धनग्न अवस्थेत भीक मांगो आंदोलन केले. मनपाची अवाजवी भाड्याची रक्कम भरण्यास गाळेधारकांकडे पैसेच नसल्याने याविरोधात त्यांनी मांगो आंदोलन पुकारले.
या आंदोलनात श्यामाप्रसाद मुखर्जी संकुलाचे अध्यक्ष हेमंत परदेशी, सचिव राजीव देसले, गणेश जगताप, सल्लागार कल्पेश सोनी, किरण भांडारकर, वसंत भावसार, आनंदा पाटील, पंकज सोनगिरे, दीपक परदेशी, साबीर शेख सय्यद, रवींद्र मोरे यांच्यासह इतर गाळेधारक सहभागी झाले. यावेळी गाळेधारकांनी थालीनाद करत मनपा प्रशासनाच्या धोरणांचा निषेध केला. महानगरपालिकेचे आयुक्त हे वारंवार सांगत असतात की जळगाव महानगरपालिकेत पैसे नसल्यामुळे शहराचा विकास करता येत नाही. जळगाव शहरातील रस्ते दुरुस्ती होत नाही. महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचे पगार होत नाही. एमएसईबीचे देणे आहे. महानगरपालिकेच्या मार्केटमधील गाळेधारक हे पैसे देत नसल्यामुळे हे सगळे कार्य अपूर्ण आहे. पैसे मिळवण्यासाठी ते गाळेधारकांवर कारवाई करण्याचे आदेश देत असतात. मात्र कोरोना महामारीमुळे गाळेधारकांची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. अशा परिस्थितीत गाळेधारकांकडेसुध्दा महानगरपालिकेला देण्यासाठी पैसे कुठे आहेत, असा सवाल करत गाळेधारकांनी मनपा प्रशासनाचा निषेध केला. जोपर्यंत गाळेधारकांच्या मागण्यांच्या ठोस विचार होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा गाळेधारकांनी दिला आहे.
भीक मांगो आंदोलनातील रक्कम मनपा प्रशासनाला देणार
गाळेधारकांनी बुधवारी केलेल्या भीक मांगो आंदोलन करून जमा झालेली रक्कम, नुकसानभरपाई म्हणून मनपा प्रशासनाला देण्यात येणार असल्याचे गाळेधारकांनी स्पष्ट केले आहे. मनपाच्या १६ अव्यावसायिक मार्केटमधील गाळेधारकांना दिवसाला जेमतेम व्यवसाय होतो त्यात महापालिका प्रशासनाच्या अवाजवी बिलामुळे नुकसानभरपाईची रक्कम भरणे अशक्य आहे. यामुळे नाइलाजास्तव व्यवसाय बंद ठेवून आम्हाला आंदोलन करावे लागत असल्याच्यी व्यथा गाळेधारकांनी यावेळी मांडली. दरम्यान, महापालिका व लोकप्रतिनिधी आमच्या समस्यांकडे लक्ष देणार नसतील तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारादेखील गाळेधारक संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.