यंदा १५ दिवसांपूर्वीच नाले सफाईच्या कामाला सुरुवात : मे अखेरपर्यंत उपनाल्यांसह मोठ्या नाल्यांची होणार सफाई
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पावसाळ्याच्या पार्श्वभूूमीवर महापालिका आरोग्य विभागाकडूून यंदा पंधरा दिवस अगोदरच शहरातील लहान ७५ नाल्यांचा सफाईच्या कामाला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापूर्वीच शहरातील उपनाल्यांसह पाच मोठ्या नाल्यांचीही सफाई करण्यात येणार असल्याचा दावा महापालिका आरोग्य विभागाकडून करण्यात आला आहे.
शहरात बुधवारपासून दूध फेडरेशन, लक्ष्मीनगर, मेहरुण, पिंप्राळा, दत्त कॉलनी या भागांमधील नाल्यांच्या सफाईला सुरुवात झाली आहे. दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शहरातील ५ मोठे नाले व ७५ उपनाल्यांच्या सफाईच्या कामाला सुरुवात होत असते. मात्र,यंदा महापालिकेने पंधरा दिवस अगोदरच नाले सफाईच्या कामाला सुरुवात केली आहे. सोमवारपासूनच या कामांना सुरुवात होणार होती. मात्र महापालिका प्रशासनाने एमआयडीसी परिसरात नवीन स्मशानभूमीच्या कामाला सुरुवात केल्यामुळे नाले सफाईच्या कामाला उशिराने सुरुवात झाली आहे. १५ मे पर्यंत सर्व उपनाल्यांची सफाई करण्यात येणार असल्याची माहिती मनपा आरोग्य अधिकारी पवन पाटील यांनी दिली आहे.
मुख्य नाल्यांच्या सफाईसाठी निविदा
उपनाल्यांची सफार्ई ही महापालिकेकडूनच करण्यात येत असते, मात्र, शहरातील मुख्य पाच नाल्यांचा सफाईचे काम हे निविदा काढून खासगी मक्तेदाराकडून केले जात असते.
शहरातील पाच मुख्य नाले असून त्यांची लांबी २३ कि. मी. आहे. त्यांची सफाई ही मक्तेदारांच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यासाठी प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबविल्या असून त्या अंतिम टप्यात आहे. नाल्यांची सफाई ही जेसीबीच्या माध्यमातून केली जाणार आहे. दरम्यान, पावसाळी उपाययोजना म्हणून मुख्य नाल्यांवरील अतिक्रमणाची देखील माहिती घेतली जाणार असून, मार्किंग केल्यानंतर पावसाळ्यापूर्वी नाल्यांवरील अतिक्रमण देखील काढण्यात येणार आहे.
दावे फोल ठरू नयेत
दरवर्षी महापालिका प्रशासनाकडून नाले सफाईचे काम झाल्यानंतर पावसाळ्यात मात्र दरवर्षी नाले सफाईचे काम व्यवस्थित न झाल्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरते. यामुळे महापालिका प्रशासनाने यंदा तरी प्रामाणिकपणे काम करून पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या समस्यांवर कायमचा मार्ग काढणे गरजेचे आहे. दरम्यान बुधवारपासून नाले सफाईच्या कामाला सुरुवात झाली असली, तरी या कामादरम्यान नाल्यातून करण्यात आलेली घाण नाल्या लगतच टाकली जात असल्याचे आढळून आले आहे. यामुळे भविष्यात पाऊस झाल्यानंतर ही घाण पुन्हा नाल्यातच पडते, व नाल्याचे पाणी रस्त्यावर येऊन ते पुन्हा घरात शिरण्याचे प्रकार देखील घडत असतात. महापालिकेच्या आरोग्य विभागाने या कामांकडे प्रामुख्याने लक्ष देऊन हे काम चांगल्या प्रकारे करून घ्यावे अशी मागणी नाल्यालगत राहणाऱ्या रहिवाशांनी केली आहे.