जळगाव : कोरोना आजारात अनेकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही दिवसात रुग्णालयात बेड न मिळणे, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध न होणे, जीवरक्षक औषधी व इंजेक्शनचा तुटवडा यामुळे अनेक कुटुंबाने जिवाभावाची माणसे गमावली आहेत. आजही गृहविलगीकरणात असलेल्या बऱ्याच रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची गरज आहे. ही गरज पूर्ण करता यावी यासाठी भवरलाल अँड कांताबाई जैन फौंडेशन आणि विनमार ओव्हरसीज पॉलीमर्स प्रा. लि., मुंबईच्यावतीने २५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
हे मशीन कांताई नेत्रालयात उपलब्ध राहणार असून ज्या रुग्णांना याची गरज भासते आहे? त्यांनी रुग्णास ऑक्सिजनची गरज असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र, किती लीटर ऑक्सिजनची गरज आहे? त्याचा तपशील ज्या रुग्णासाठी हवे आहे, त्यांचे आधारकार्ड, पूर्ण पत्ता व इतर आवश्यक तपशील मशीन नेणाऱ्याचे आधारकार्ड, ओळख असणाऱ्या व्यक्तीचा संपूर्ण तपशील सादर करणे गरजेचे असेल. या फौंडेशनच्या वतीने नि:शुल्क दिली जाणारी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन ही ५ लीटर क्षमतेची असणार आहेत. रुग्णास लागणाऱ्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची गरज नसल्याचे चित्र लक्षात आल्यावर हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर कांताई नेत्रालयास परत करावयाचे आहे.
या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची गरज असणाऱ्या रुग्णाच्या नातेवाइकांनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या उपलब्धतेबाबत विजय मोहरीर, सुधीर पाटील, उदय महाजन, अनिल जोशी, नितीन चोपडा, अमर चौधरी, डॉ. प्रदीप ठाकरे, कांताई नेत्रालय, निमखेडी रोड येथे संपर्क करावा, असे आवाहन फौंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
-----
फोटो कॅप्शन : भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशनच्यावतीने कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध असलेले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन.