चोपडा : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत लाभार्थींना काम सुरू करण्याबाबत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
३० जुलै रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात शिवसेना नगरसेविका संध्या महाजन यांनी लाभार्थींच्या वतीने निवेदन सादर केले.
विभागीय आयुक्तांच्या पत्रांनुसार नगरपालिकांना कामे सुरुवात न झालेल्या लाभार्थींना १५ दिवसांची नोटीस देऊन इच्छुक नसलेल्या लाभार्थींची नावे ३० जुलैपर्यंत वगळण्याची कार्यवाही करण्याबाबत आदेश होते. चोपडा नगरपरिषदेतर्फे पंतप्रधान आवास योजना घटक क्र. ४ वैयक्तिक घरकुलास अनुदान अंतर्गत २०० व १३५ लाभार्थी असे दोन डीपीआर मंजूर आहेत. या घटकांतर्गत लाभार्थींना लाभ घेण्यासाठी बांधकाम परवानगी, त्याकामी कागदपत्रांची पूर्तता, पत व्यवस्था अशा काही बाबींची तजवीज करावी लागते. परंतु मागील दीड वर्षापासून कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच वाळू उत्खननावर बंदी असल्याने वैयक्तिक घरकुलांचे बांधकाम करण्यास लाभार्थींना अडचणी निर्माण होत आहे. अशा काही अडचणी असलेल्या लाभार्थीची घरकुले बांधकामास सुरुवात झालेली नाही.
या अडचणींमुळे नागरिक इच्छुक असूनही त्यांची नावे वगळण्याची वेळ आलेली आहे. यादीत समाविष्ट लाभार्थीना योजनेचा लाभ व्हावा. त्यामुळे कागदपत्रांची वा इतर अडचण असलेल्या परंतु बांधकामास इच्छुक लाभार्थीना अधिक वेळ मिळावा यासाठी मुदतवाढ मिळणे गरजेचे आहे.
निवेदनास शिवसेना गटनेता महेंद्र धनगर, नगरसेवक महेश पवार, राजाराम पाटील, रवींद्र पाटील, लताबाई पाटील, मीनाबाई शिरसाठ यांनी अनुमोदन दिले आहे.