जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून तीन महिन्यांत सुमारे ३७३ रुग्णांना महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभ मिळाला आहे. या योजनेंतर्गत कोरोनाबाधित रुग्ण, म्युकरमायकोसिस रुग्णांवर मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यात येत आहे.
नागरिकांना आरोग्याशी संबंधित ९७१ प्रकारच्या तपासण्या, उपचार आणि शस्त्रक्रियांसाठी दीड लाख रुपयांपर्यंतचा विमा लाभ या योजनेंतर्गत रुग्णांना देण्यात येत असतो. या योजनेत मार्चपासून आतापर्यंत सुमारे ३७३ लाभार्थी रुग्णांवर मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यात ३०६ कोरोनाबाधित आणि संशयित रुग्ण तर २८ म्युकरमायकोसिस रुग्णांची नोंदणी झाली आहे. तसेच सुमारे ३९ नवजात बालकांनी सुद्धा योजनेतून मोफत उपचार घेतला. म्युकरमायकोसिस बाधित दोन रुग्णांवर या योजनेतून शस्त्रक्रिया झाल्या आहेत. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचे अध्यक्ष तथा उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, योजनेचे सचिव तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे यांच्या मार्गदर्शनानुसार नोडल अधिकारी डॉ. अलोक यादव यांच्या नेतृत्वाखाली कार्यालयातील कर्मचारी माधुरी पाटील, आरती दुसाने, अभिषेक पाटील, संदीप माळी, तेजस वाघ रुग्णांच्या नातेवाइकांना मार्गदर्शन करीत आहेत.