जामनेर : गरोदर माता व बालमृत्यूच्या संख्येत घट व्हावी या उद्देशाने तालुक्यात मागील तीन वर्षापासून प्रधानमंत्री मातृवंदना योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण ४ हजार ५८८ गरोदर मातांच्या बँक खात्यावर आॅनलाइन प्रणालीद्वारे १ कोटी ८६ लाख ३ हजार रुपये वर्ग करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.सुदृढ व निरोगी बालक जन्माला यावे तसेच गरोदर माता व बालमृत्यूच्या संख्येत घट व्हावी यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री मातृवंदना योजना १ जानेवारी २०१७ पासून लागू केली आहे.या योजनेअंतर्गत पहिला हप्ता १ हजार रुपये दिला जातो. त्यासाठी लाभार्थी महिलेने गरोदरपणाची नोंद आरसीएच पोर्टलमध्ये एएनएम यांच्याकडे १०० दिवसांच्या आत करणे आवश्यक आहे. दुसरा हप्ता २ हजार रुपये असून गरोदरपणाची सहा महिन्यात (१८० दिवस) किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी होणे आवश्यक आहे. तर तिसरा हप्ता २ हजार रुपये देण्यात येतो. यासाठी प्रसूतीनंतर बाळाच्या जन्माची नोंद बीसीजी, ओपीव्ही (झीरो डोस) याची एक मात्रा तसेच पेंन्टाव्हॅलेट ओपीव्ही लसीच्या तीन मात्रा घेणे आवश्यक आहे. असे एकूण ५ हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतात.केंद्र शासनाने महिला व बाल विकास मंत्रालयातर्फे प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरु केली आहे. योजनेसाठी गरोदर मातांची शासकीय किंवा शासनमान्य रुग्णालयात नाव नोंदणी करावी. अडचणी असल्यास आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपजिल्हा रुग्णालयात संपर्क करावा, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांनी केले आहे.जनजागृतीवर भर.....ग्रामीण भागात मातृवंदना योजनेची आशा स्वयंसेविका यांच्या मार्फत व शहरा मध्ये अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत जनजागृती केली जात आहे. तसेच हा लाभ फक्त पहिल्या खेपेच्या मातेसाठीच असून शासकीय नोकरी सोडून सर्व महिलांना पहिल्या बाळंतपणासाठी काही अटी पूर्ण केल्यावर ही योजना लागू आहे.
५ हजार गरोदरमातांना मातृवंदना योजनेचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 7:18 PM