जनजागृतीचा अभाव : चार वर्षात ७१ हजार पात्र लाभार्थी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : प्रथमत: गर्भवती व स्तनदा माता यांना २०१७ पासून प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत पाच हजारांचे अनुदान दिले जाते. जिल्ह्यात गेल्या चार वर्षात ७१ हजार ७५५ महिलांना याचा लाभ देण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्ष प्रसुतींची संख्या बघता त्या मानाने कमी महिलांना हा लाभ देण्यात आला असून निकषांचा गुंता किंवा जनजागृतीचा अभाव ही कारणे या मागे असल्याचे सांगितले जात आहे.
अनेक गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात मजुरीसाठी काम करावे लागते, यामुळे अशा गर्भवती महिला व माता कुपोषित राहून त्यांचे व त्यांच्या नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्या पार्श्वभूमीवर महिलांना सकस आहार घेण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा करण्याच्या हेतूने ही योजना १ जानेवारी २०१७ पासून सर्वत्र सुरू करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातही तेव्हापासून ही योजना लागू झाली आहे. आता पर्यंत ग्रामीण भागातील ५२०५३ महिलांना तर शहरी भागातील १९७०२ महिलांना लाभ मिळाला आहे.
हे आहेत निकष
केंद्र व राज्य सरकारच्या कर्मचारी महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळत नाही, लाभ घेण्यासाठी मान्यता प्राप्त आरोग्य केंद्रात नोंदणी करणे आवश्यक असते. प्रथमत: गर्भवती महिला व स्तनदा माता यांच्या जिवीत अपत्यासाठी हा लाभ दिला जातो.
नातेवाईकांना माहिती नाही
जिल्हा रुग्णालयात प्रसुतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या अधिक आहे. या ठिकाणी नेमका या योजनेच्या अंतर्गत महिलांना लाभ दिला जातो का नाही, याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र, हा लाभ दिला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. काही नातेवाईकांकडून माहिती घेतली असता अनेकांना या योजनेबाबत माहितीच नसल्याचे चित्र आहे.
२०१९- २०२०
शासकीय रुग्णालयात प्रसुती
२९७१३
खासगी रुग्णालयात प्रुसती
४३३४६
मातृवंदना योजनेच्या लाभार्थी
७१५५५