आता प्रतीक्षा : सात वर्षानंतर मिळणार सेवा
जळगाव,दि.30- नव्याने जाहीर करण्यात आलेल्या विमान मार्गात जळगाव विमानतळाचा समावेश करण्यात आला असल्याने तब्बल सात वर्षाच्या प्रतीक्षेनंतर शहरवासीयांना 2500 रुपयात विमान प्रवास करता येणार आहे.
केंद्र शासनाने जाहीर केलेल्या उड्डाण योजनेत नवे 45 विमान मार्ग जाहीर करण्यात आले आहेत. यात महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला असून जळगाव येथेही विमानसेवा प्रस्तावित करण्यात आली आहे. जळगाव ते मुंबईचे अंतर या सेवेमुळे आणखी कमी होणार असून उद्योजक, व्यापारी, अधिकारी तसेच नागरिकांसाठी ही सेवा मोठी उपलब्धी ठरणार आहे.
सात वर्षापासून प्रतीक्षा
2010 मध्ये जळगाव विमानतळ पूर्ण होऊन तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन झाले होते. तेव्हापासून विमानसेवेबाबत प्रतीक्षा होती. यासाठी विविध विमान कंपन्यांशी स्थानिक उद्योजकांनी संपर्क साधून सेवा मिळावी असे प्रय} केले होते मात्र त्यात यश येऊ शकले नव्हते.
तसेच मुख्यमंत्र्यांनी राज्यातील 10 विमानतळांचा विस्तार व तेथून विमान सेवा सुरू करण्याचे जाहीर केले आहे. त्यात जळगाव विमानतळाचाही समावेश होता.
कंपन्यांची नकार घंटा
पुरेसे प्रवासी मिळणे शक्य होणार नाही या शक्यतेने विविध विमानसेवा देणा:या कंपन्यांकडून विमानतळ विकास प्राधिकरणास नकारच मिळत आला आहे. स्थानिक उद्योजकांनी यासाठी पुढाकार घेऊन जेट, किंगफिशर सारख्या कंपन्यांशी तीन वर्षापूर्वी संपर्क साधला. जेटतर्फे यासाठी सव्रेक्षणही झाले होते. मात्र नंतर या कंपनीनेही नकार घंटा वाजविली होती.
अशा आहेत विमान तळावर सुविधा
जळगावपासून पाच कि.मी. अंतरावरील कुसुंबा गावाजवळ 303 हेक्टर जमिनीवर विमानतळाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम 2010 मध्ये पूर्ण झाले आहे.
विमानतळासाठी प्राप्त 61 कोटींच्या निधीतून विविध कामे झाली आहेत. यात प्रवासी टर्मिनल पूर्ण झाले आहे. या टर्मिनलची विद्युत उपकरणे ही सौर ऊज्रेवर चालणार आहेत. प्रवासी टर्मिनलमध्ये अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी दोन कक्ष, प्रवाशांसाठी मोठे प्रतीक्षालय, सुरक्षा तपासणी केंद्र आहे. विमानतळासाठी स्वतंत्र वीज फिडर बसविण्यात आला आहे. यासाठी स्वतंत्र भूमिगत वीज वाहिनी टाकण्यात आली आहे.