लोकमत इफेक्ट
लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : नांद्राखुर्द गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगतचे लोखंडी खांब जमिनीकडे झुकल्यामुळे शेतकऱ्यांसह वाहनधारकांच्या जिवितास धोका निर्माण झाल्याचे वृत्त मंगळवारी 'लोकमत'मध्ये प्रकाशित होताच महावितरणकडून झुकलेले खांब सरळ करण्याची कार्यवाही सुरू झाली. यामुळे परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.
नांद्राखुर्द गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या वीजवाहक तारा गेल्या काही वर्षांपासून धोकादायक स्थितीत होत्या. महावितरणकडून होत असलेल्या सततच्या दुर्लक्षामुळे या भागातील बहुतांश लोखंडी खांब जमिनीकडे झुकले होते. विजेच्या तारा अगदी हाताच्या अंतरावर लोंबकळत असल्याने अनावधाने स्पर्श झाला तरी विजेचा धक्का लागून मोठी जीवित हानी होण्याची शक्यता बऱ्याच ठिकाणी निर्माण झाली होती. लोंबकळणाऱ्या वीजवाहक तारांमुळे मुक्या जनावरांच्या जीवालासुद्धा धोका निर्माण झाला होता.
दरम्यान, महावितरणकडून शेतकऱ्यांकडील थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी जेवढी तत्परता दाखविण्यात येत आहे तेवढी धोकादायक खांब बदलण्यासाठी न दिसल्याने सर्वत्र नाराजी व्यक्त होत होती. या विषयी 'लोकमत'ने सचित्र वृत्त प्रकाशित करीत त्याकडे लक्ष वेधले. याची दखल घेत महावितरणने विदगाव येथील वीज उपकेंद्राच्या माध्यमातून समस्या सोडविण्यासाठी पावले उचलली.
--------------
फोटो-
ममुराबाद- नांद्राखुर्द रस्त्यालगत झुकलेले विजेचे खांब 'लोकमत'च्या वृत्तानंतर मंगळवारी महावितरणकडून तातडीने सरळ करण्यात आले. (जितेंद्र पाटील)