जळगाव : प्रेमप्रकरणातून रफूचक्कर झालेले प्रेमीयुगुल लग्नाच्या बेडीत अडकले तर दुसरीकडे तपासावर असलेल्या पोलिसांनी शुक्रवारी दोघांना वावडदा, ता.जळगाव येथून ताब्यात घेतले. रामानंद नगर पोलीस ठाण्यात दोन्हीकडील नातेवाईक जमले होते, उशिरापर्यंत मुलीने पालकांसोबत जाण्यास नकार दिला. मुक्ताईनगर तालुक्यातील २१ वर्षीय तरुणी घरुन रफूचक्कर झाली. ती बेपत्ता झाल्याची मुक्ताईनगर पोलिसात नोंद आहे. रफूचक्कर झालेल्या तरुणीने जळगाव शहरातील आशाबाबा नगर येथील प्रियकरासोबत विवाह केला आहे. विवाहबध्द झालेल्या प्रेमीयुगुलाला रामानंदनगर पोलिसांनी शुक्रवारी जळगाव तालुक्यातील वावदडा येथून ताब्यात घेतले आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील २१ वर्षीय रेखा (काल्पनिक नाव) घरुन बेपत्ता झाली होती. सर्वत्र शोध घेऊनही आढळून येत नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी ती बेपत्ता झाल्याबाबत मुक्ताईनगर पोलिसात तक्रार दिली होती. काही दिवसांपासून आरती व जळगावातील मुकेश (काल्पनिक नाव) यांच्यात प्रेमप्रकरण सुरु होते. त्यातून त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. लग्नाला विरोध होईल म्हणून दोघांनी पलायन केले व २१ जानेवारी रोजी पद्मालय येथील गणपती मंदिरात विवाह केला. दरम्यान, या दोघांच्या पलायनाबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी विनोद सोनवणे यांना माहिती मिळाली. त्यानुसार सोनवणे यांनी होमगार्ड निशांत विसपुते, डिगंबर महाजन यांच्या मदतीने विवाहबध्द प्रेमीयुगुलाला वावदडा येथून ताब्यात घेतले.