- स्टार : 725
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : फेसबुकवरून पैशांची मागणी करून फसविण्याचे प्रकार वाढले आहेत. जळगाव जिल्ह्यात पोलिसांकडे वर्षभरात ७२ जणांनी आपल्याला आलेले अनुभव सांगितले, तर २४ जणांनी तोंडी तक्रारी गेल्या तर त्यातील काहींनी लेखी अर्ज दिले. सायबर पोलिसांकडे आलेल्या नागरिकांचे जागेवरच त्यांच्या मोबाइलवरून बनावट खाते डिलीट करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या प्रोफाइल बंद करण्यात आल्या आहेत. खाते बंद झाल्यामुळे तक्रारदारांनी फिर्याद दिली नाही. त्यामुळे फेसबुकवरून पैसे देऊन फसवणूक झाल्याबाबत एकही गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहिती सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बळीराम हिरे यांनी 'लोकमत'ला दिली.
बनावट खाते तयार करून मित्र, नातेवाईक यांच्याकडे पाच ते दहा हजारांपासून तर लाख रुपयांपर्यंतची मागणी झालेली आहे. खूप संकटात आहे, दवाखान्यात उपचारासाठी पैशाची गरज आहे, अशी कारणं सांगून पैशांची मागणी केली जात असल्याचे प्रकार सर्रास सुरू झालेले आहेत.
=======
गेल्या वर्षभरात सायबर पोलिसांकडे झालेल्या तक्रारी : ७२
फेसबुकवरून फसविल्याच्या तक्रारी : २४
=======
- परिचयातील व्यक्तीच्या नावाचाच वापर
पोलिसांच्याही नावाचा वापर
जळगाव शहरात काही पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे गणवेशातील फोटो असलेले बनावट खाते तयार करून नातेवाइकांना १२ ते १५ हजार रुपये मागण्यात आले. जिल्हा विशेष शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, रामानंदनगरचे सहायक निरीक्षक संदीप परदेशी तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या नावाने पैसे मागण्यात आल्याचा प्रकार उघड झाला.
बांधकाम व्यावसायिकाचेही खाते
जळगाव शहरात बांधकाम व्यावसायिक तथा नगरसेविक चंद्रशेखर अत्तरदे यांचे गेल्या आठवड्यात फेसबुकवर बनावट खाते उघडून त्यांच्या नावाने पैसे मागण्याचा प्रकार घडला होता. त्यांच्या नावाने मित्रांना पैसे मागण्यात आले होते.
दवाखान्याचे कारण सांगून मागितले पैसे
एका प्रकरणात पत्रकार जुगल पाटील यांच्या नावाने त्यांच्या मित्रांना हिंदीतून मदतीची अपेक्षा व्यक्त करून दहा ते पंधरा हजार रुपयांची मागणी करण्यात आली. ही रक्कम सकाळी १० वाजेपर्यंत परत करतो, असेही सांगण्यात आले इतर मित्रांनी हा प्रकार लक्षात आणून दिला. काहींना दवाखान्याचे कारण सांगण्यात आले.
अशी घ्या काळजी
ज्यांची फेसबुक प्रोफाइल बनावट तयार केली आहे, त्यांनी आपल्या स्वतःच्या फेसबुक खात्यावरून बनवलेली बनावट प्रोफाइल शोधावी. स्वतःला शोधता येत नसेल तर ज्या मित्रांना त्या प्रोफाइलवरून रिक्वेस्ट गेली आहे, त्यांच्याकडून बनावट प्रोफाइलची फेसबुक लिंक (यूआरएल) मागवून घ्यावी. त्या प्रोफाइलवर गेल्यानंतर उजव्या बाजूला तीन डॉट दिसतील. त्या डॉटवर क्लिक करा. तुमच्यासमोर फाइन सपोर्ट ऑफ रिपोर्ट प्रोफाइल हा ऑप्शन दिसेल, अशी त्यावर क्लिक करा प्री-टेंडिंग टू बी सोमिऑन हा पहिला ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा. पुढे तीन ऑप्शन दिसतील. मी, ए फ्रेंड आणि सेलिब्रिटी. आपण आपली बनवलेली बनावट प्रोफाइल रिपोर्ट करत असल्याने त्यापैकी मी हा ऑप्शन सिलेक्ट करा आणि नेक्स्ट करा फेक प्रोफाइल खाते काहीवेळाने बंद होईल.
कोट...
फेसबुकच्या बनावट खात्यावरून पैशाची मागणी होत असल्यास कोणीही व्यवहार करू नये. खातेदाराने तातडीने खाते बंद करून फेसबुकवर पैसे न देण्याबाबत मेसेज टाकावा. शक्यतो आपली प्रोफाइल लाॅक ठेवावी. धमक्यांना घाबरू नये, शंका आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा.
- बळीराम हिरे, पोलीस निरीक्षक सायबर पोलीस ठाणे