पुरेशी झोप घ्या, सुदृढ रहा : डॉक्टरांचा सल्ला, अति झोपही धोकादायक
लोकमत न्यूज नेटवर्क
आनंद सुरवाडे
जळगाव : कोविडच्या काळात आरोग्यप्रती आपण किती जागृत रहायला पाहिजे याचा धडा सर्वांना मिळाला आहे. छोट्या छोट्या गोष्टींमुळे आरोग्यावर काय विपरीत परिणाम होऊ शकतात, याची असंख्य उदाहरणे या काळात समोर आली. त्यातच कमी व अधिक झोप कशी धोकादायक ठरू शकते, शिवाय कमी झोपेमुळे तुमची प्रतिकारक्षमता कमी होऊ शकते, त्यामुळे पुरेशी झोप घेणे अत्यावश्यक असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आरेाग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेकांना विविध विकारांचा सामना करावा लागत आहे. यात अपुऱ्या झोपेमुळे अनेकांना समस्यांचा सामना करावा लागतो. सामन्य माणसाला किमान ६ ते ८ तास झोप घेणे अत्यावश्यक असते. मात्र, अनेकांची यापेक्षा कमी किंवा यापेक्षा अधिक झोप होत असते. हा समतोल राखला जाणे सुदृढ आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करतात.
किमान सहा तास झोप आवश्यक
तरुण ते वृद्धांपर्यंत सर्वांना ६ ते ८ तास झोप आवश्यक असते.
० ते ४ वर्ष - १८ ते २० तास
४ ते १२ वर्ष - ८ ते १० तास
१२ ते १८ वर्ष - ८ ते १० तास
१८ ते ६० वर्ष ६ ते ८ तास
अपुऱ्या झोपेचे तोटे
अपुऱ्या झोपेमुळे चिडचिडपणा वाढतो. नियमित अपुरी झोप असल्यास त्याचे शरीरावर वाईट परिणाम होत असतात. यात प्रतिकारक्षमता खालावते व अन्य आजार बळावतात. अनेकांमधील राग वाढतो, कामात लक्ष लागत नसल्याने महत्त्वाच्या कामांकडे दुर्लक्ष होत असते.
रोगप्रतिकारकशक्ती आपल्या शरीराची ढाल
कोणत्याही आजाराचा सामना करण्यासाठी शरीरातील रोगप्रतिकारक्षमता सर्वात महत्त्वाची भूमिका बजावत असते. कोविडच्या काळातही ज्याची प्रतिकारक्षमता चांगली. त्यांच्यात आजाराने गंभीर रूप धारण केलेले नव्हते. अन्य व्याधी असलेल्यांना कोविडचा अधिक धोका होता हे आकडेवारीवरून समोर आले आहे. अशा स्थितीत तुमची प्रतिकारक्षमता उत्तम राहणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी पुरेशी झोप घेणे हा त्यातील एक महत्त्वाचा भाग आहे.