भडगाव : भडगाव : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून भडगावचे नगरसेवक व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांना मारहाण करीत त्यांच्या खिशातील रक्कम लुटून नेल्याची घटना १३ रोजी रात्री १० वाजता हॉटेल सदिच्छासमोर झाली. या प्रकरणी चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भाजपा नगरसेवक अमोल नाना पाटील हे १३ रोजी रात्री चाळीसगाव रस्त्यावरील स्वामी समर्थ नगरातील हॉटेल सदिच्छाजवळ उभे होते. याच वेळी संशयित योगेश गुलाब पाटील (रा.भडगाव), योगेश अर्जुन गव्हाणे (रा.चाळीसगाव), सोनू बापू अहिरे (रा.चाळीसगाव) व अक्षय पिरचंद पाटील (रा.चाळीसगाव) यांनी दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. अमोल पाटील यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने चौघांनी त्यांच्या खिशातील तीन हजार रुपये काढून घेतले.यावेळी चौघांनी खिशात अजून काही असेल तर काढून दे अन्यथा ठार मारू अशी धमकी दिली.या घटनेतील संशयित योगेश गव्हाणे हे भाजयुमोचे चाळीसगाव तालुका सरचिटणीस असल्याची माहिती समोर येत आहे. तर अन्य दोघे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर येत आहे.दरम्यान, या घटनेनंतर नगरसेवक पाटील यांनी पोलीस स्टेशनला धाव घेत फिर्याद दिली. त्यानुसार चौघांविरूद्ध भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, या घटनेनंतर भडगाव पोलिसांनी गुन्ह्याबाबत गोपनीयता कायम ठेवली. शनिवारी भडगाव व शहरात शिवसेना व भाजपा युतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला होता. त्यात ही पैसे लुटल्याची घटना झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयितांचा शोध सुरु केला आहे.अमळनेरनंतर भडगावात हाणामारीअमळनेर येथे तिकिट कापल्याच्या कारणावरून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर जिल्हाध्यक्ष उदय वाघ समर्थकांनी माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील यांना मारहाण केली. या घटनेला काही दिवस होत नाही तोच भडगाव शहरात भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक अमोल पाटील यांना मारहाण करीत त्यांच्या खिशातील पैसे लुटून नेल्याची घटना समोर आली आहे. भारतीय जनता पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे वाद यानिमित्ताने समोर येत आहेत.
भाजयुमो जिल्हाध्यक्षाला लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 2:52 PM