भडगाव, जि.जळगाव : येथे केशवसूत ज्ञानप्रबोधिनीमार्फत काढण्यात आलेली ग्रंथदिंडी व शोभायात्रा खास आकर्षण ठरली. यामुळे लक्ष वेधले गेले. या शोभायात्रेत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ माँसाहेब, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर इत्यादी राष्ट्रपुरुषांचे पेहराव केलेली शाळकरी मुले-मुली, बेटी बचाव-बेटी पठाव, स्वच्छ भारत अभियान, शहीद जवान, पर्यावरण संवर्धन इत्यादी विषयांरील आकर्षक चित्ररथ, मुलीचे लेझीम पथक, ढोल पथक, कानबाई ओव्या, भजनी मंडळ, गोंधळ इत्यादी पारंपरिक प्रकार यामुळे भडगाव शहरात प्रजासत्ताक दिनाच्या संचालनाचे स्वरूप प्राप्त झाले होते.निमित्त होते केशवसुत ज्ञानपबोधिनी या संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष व त्यानिमित्ताने काढण्यात आलेली ग्रंथदिंडी व शोभायात्रा. सकाळी केशवसुत वाचनालयापासून पी.टी.सी. चेअरमन संजय वाघ, नगराध्यक्ष अतुल पाटील, मुख्याधिकारी विकास नवाळे व मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडीचे पूजन करण्यात आले. नंतर शोभायात्रेस सुरुवात झाली. शोभायात्रा दीड किलोमीटर अंतरापर्यंत होती. समस्त भडगाववासियांनी दिंडीचे अभूतपूर्व स्वागत केले व सर्वांच्या सहभागामुळे शोभायात्रेस ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले. नगरपरिषद, मेनरोड, बसस्थानक परिसर, बाळद रोड मार्गे डी.एड.कॉलेजमध्ये शोभायात्रेचा समारोप झाला.या शोभायात्रेत व ग्रंथदिंडीत पिंपळगाव येथील पंचरंगीं कलापथक, नगरदेवळा येथील शाहीर शिवाजी पाटील यांचे पथक, एरंडोल येथील तुतारी पथक, वाक येथील चक्रधर भजनी मंडळ, भडगाव येथील सद्गुरू ओविमंडळ, डॉ.पूनम पवार विद्यालय, सु.गी.पाटील विद्यालय, आदर्श कन्या विद्यालय, लाडकूबाई विद्यामंदिर, र.ना.देशमुख कॉलेज, युनूसखान हायस्कूल, जागृती मित्र मंडळ हे सहभागी झाले होते. विविधरंगी ध्वज, पताका यामुळे वातावरणात उत्साह दिसून येत होता. सर्व शाळांचे शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते.
भडगाव येथे ग्रंथदिंडी व शोभायात्रेने वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 7:53 PM