येथील ग्रामीण रुग्णालयात यापूर्वीही महिला प्रसूती केंद्र होते; मात्र सोयी सुविधांची वानवा असल्याने उपचारांसाठीही अडचणीचे ठरताना दिसून येत होते. रुग्णालयात गरोदर मातांची तपासणी व प्रसूतीसारख्या सेवा अद्यापही चालू आहेत. यात वर्षभरात साधारण प्रसूती एकूण २७९ झालेल्या आहेत, तर महिलांच्या सिझर ४५ इतक्या करण्यात आलेल्या आहेत.
या ठिकाणी जास्त करून सिझरसाठी केसेस खासगी रुग्णालयात पाठविल्या जात असल्याची चर्चा अनेकदा कानी पडत होती. सध्या रुग्णालयात ३० खाटा आहेत. रक्त संकलन केंद्र चालू आहे. एकात्मिक समुपदेशन कक्ष, प्रसूती महिला कक्ष, कुटुंब कल्याण शस्त्रक्रियाही केल्या जातात.
अशा मिळणार सुविधा
भडगाव ग्रामीण रुग्णालयात महिला प्रसूती रूमचे, तसेच ऑपरेशन थिएटरचेही अद्ययावत काम पूर्ण झाले आहे. नवजात शिशू अद्ययावत कक्ष, आदी यंत्रसामग्रीसह उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे या सोयी सुविधा उपलब्ध होताना दिसत आहेत. ग्रामीण रुग्णालयात शासनाच्या धोरणानुसार सिझरियन सेक्शनची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यात अद्ययावत वैद्यकीय उपकरणांसह सुविधा मिळणार आहेत. स्त्रीरोग तज्ज्ञ डाॅ. अतुल महाजन पाचोरा, भुलतज्ज्ञ डाॅ. सागर गरूड पाचोरा यांची सेवेसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. नवजात शिशु बालकांसाठी वार्मर, ऑक्सिजन सुविधा येथे मिळणार आहे. बालरोग तज्ज्ञ म्हणून डाॅ. साहेबराव अहिरे हे सेवा देणार आहेत. याशिवाय वाढीव वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती भडगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. पंकज जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
050721\05jal_9_05072021_12.jpg
भडगाव ग्रामीण रुग्णालयात अद्ययावत महिला प्रसुती रुम.