जळगाव : भडगाव येथील उप कार्यकारी अभियंता यांना झालेल्या मारहाणीत वाचविण्यासाठी गेलेले वायरमन गजानन राणे यांनाही धक्काबुक्की होऊन, त्याचा या घटनेत मृत्यू झाला. या घटनेची राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी गंभीर दखल घेतली असून,या घटनेतील दोषींवर कडक कारवाईसाठी आपण स्वतः प्रयत्न करणार असल्याचे ट्विटर वरुन सांगितले आहे. तसेच या घटनेच मृत्यू झालेल्या राणे यांच्या कुटूंबियांप्रतीही दुःख व्यक्त केले आहे.
महावितरणचे भडगावचे उप कार्यकारी अभियंता अजय घामोरे यांच्यावर सोमवारी दुपारी महावितरणच्या कार्यालयातच अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. यावेळी त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या वरिष्ठ तंत्रज्ञ गजानन राणे यांनाही त्या हल्लेखोरांनी धक्काबुक्की केली. या मारहाणीत राणे हे जमिनीवर कोसळले आणि काही क्षणातच त्यांचा मृत्यू झाला. या घटने प्रकरणी अज्ञात हल्लेखोरांवर भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या घटने प्रकरणी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी ट्विटर वरून या घटनेबद्दल दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
उर्जा मंत्र्यांचे ट्विट
उर्जा मंत्र्यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे की, भडगाव येथे कर्तव्यावर असलेले वायरमन गजानन राणे यांचा जबर मारहाणीत दुर्दैवी मृत्यू झाल्याचे वृत्त अतिशय दुःखद आहे. शोक संतप्त कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. तसेच मारहाणीत उप कार्यकारी अभियंता अजय घामोरे हेदेखील जखमी झाले आहेत. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाईसाठी मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटल आहे.