जळगाव : शहरापासून अवघ्या 14 किलोमीटर अंतरावर असलेल्या भादली बु.।। गावातील भोळे कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या झाल्याने भादली गावासह पंचक्रोशी हादरली आहे. प्रदीप भोळे यांचे कुणाशी वैर, भांडण नसताना त्यांच्यासह चौघांची हत्या झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेचा तत्काळ तपास लावून आरोपींना गजाआड करावे, अशी ग्रामस्थांनी मागणी केली असून मंगळवारी गाव बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, या हत्येच्या तपासासाठी पोलीस दलाने चक्रे गतिमान केली असून नाशिक येथील ‘आरएफएसएस’चे पथकही सोमवारी रात्री दाखल झाले होते. पोलीस अधिकारी ठाण मांडूनपोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, अपर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, आयपीएस अधिकारी मनीष कलवानिया, एलसीबीचे निरीक्षक राजेशसिंग चंदेल, भुसावळ उपविभागीय अधिकारी नीलोत्पल, राहुल वाघ आदींनी घटनास्थळी धाव घेऊन परिसराची पाहणी केली. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांनी मागोवा घेण्यासाठी तळ ठोकले आहे.जिल्हा रुग्णालयातही रक्तस्त्राव मृतदेहांवरील घाव इतके गंभीर होते की, चौघांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणले तोर्पयत चादरीमधून रक्त खाली पडत होते. चौघांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर येथे बघ्यांची गर्दी सुरू झाली होती. त्यामुळे शवविच्छेदनगृहाचे प्रवेशद्वार बंद करण्यात येऊन नागरिकांना येण्यापासून रोखण्यात आले. सुरुवातीला साधारण तासभर गर्दी कमी होती; मात्र साडेबारा वाजेनंतर भादली, ईसोदा या गावातील नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतल्याने येथे गर्दी वाढत होती. मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणले तेव्हापासूनच पोलिसांचा ताफा जिल्हा रुग्णालय परिसरात होता. यामध्ये नशिराबाद पोलीस ठाण्यासह शहरातील विविध पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी जिल्हा रुग्णालयात थांबून परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते. घटनेबाबत हळहळया घटनेबाबत जिल्हा रुग्णालय परिसरात ग्रामस्थांसह जिल्हा रुग्णालयातील रुग्णांचे नातेवाईकही एकत्र येऊन हळहळ व्यक्त करीत होते. विशेषत: घटनेतील दोघी लहानग्यांबाबत अधिक चर्चा होऊन एवढय़ा लहान मुलांना मारण्याचे कारण काय? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. एकूणच या हत्याकांडाने जिल्हा रुग्णालय परिसरदेखील सुन्न झाला होता. आजी-माजी मंत्र्यांच्या भेटीमाजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी सकाळीच गावात भेट देऊन नातेवाइकांशी चर्चा केली. त्यानंतर आमदार एकनाथराव खडसे, खासदार ए.टी.पाटील यांनीही भेट दिली. राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देऊन नातेवाइकांचे सांत्वन केले. दिवसभर विविध क्षेत्रातील लोकांनी गावात, तसेच रुग्णालयात भेटी दिल्या.जिल्हा परिषद सदस्य लालचंद पाटील, पंचायत समिती सभापती यमुनाबाई रोटे, पं.स. सदस्या जागृती चौधरी, पंकज महाजन, विजय नारखेडे, योगेश पाटील, किरण पाटील आदींनी भेट देऊन पाहणी केली.शवविच्छेदन करण्यापूर्वी सरकारी पंच आवश्यक असल्याने तो मिळत नव्हता. त्यात घटनेत मयत महिला असल्याने त्यासाठी महिला पंचच आवश्यक होती. त्यामुळे महिला व मुलीच्या शवविच्छेदनास जिल्हा सामान्य रुग्णालयात विलंब होत गेला. तसे पाहता कोणत्याही सरकारी कार्यालयाचा पंच यासाठी चालतो. याबाबत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भेटीदरम्यान तहसीलदार अमोल निकम यांच्याशी संपर्क साधून सरकारी पंच उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. त्या वेळी तहसीलदार निकम यांनी भादलीच्या महिला तलाठी यांना पंच म्हणून पाठविले व निकम हे स्वत:देखील जिल्हा रुग्णालयात आले होते. दरम्यान, याबाबत तहसीलदार निकम यांनी सांगितले की, महिला पंच आवश्यक असल्याने त्या कामात होत्या. येण्यास केवळ पाच मिनिटे वेळ लागला. विलंब वगैरे झालेला नव्हता. पंच दाखल झाल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी सव्वासहा वाजता मृतदेह भादली गावाकडे रवाना करण्यात आले. पती-पत्नीवर तीक्ष्ण हत्याराने वाऱ़़ भादली हत्याकांडात मरण पावलेल्या पती-पत्नीवर तीक्ष्ण हत्याराने, तर दोघा मुलांवर हातोडा अथवा दगडाने वार केल्याचा अंदाज अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील व्यक्त केला. चारही जणांच्या डोक्यावर डाव्या बाजूला वार केलेले आहे. प्रदीप भोळे हे मदन खडसे यांच्या भागीदारीने गावातील व्यापारी संकुलात श्रद्धा चायनीज नावाने हॉटेल सुरूकरणार होते. तेथे अशोक मुंजोबा शेळके (रा.इस्लामपुरा, जळगाव) हे रात्री मुक्कामाला थांबले होते. वरच्या मजल्यावर झोपलेले असल्याने भोळे हॉटेलला कुलूप लावून घरी आले होते, त्यामुळे शेळके हे हॉटेलमध्येच होते. सकाळी दहा वाजता त्यांची हॉटेलमधून सुटका झाली. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याकडून माहिती घेतली.
चौघांच्या हत्येने भादली गाव सुन्न
By admin | Published: March 21, 2017 12:24 AM