सोनगड - व्यारादरम्यान झाला अपघात : मुलगीसह दोन्ही नातीही सुखरूप
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मनपातील भाजपचे गटनेते भगत बालानी यांच्या वाहनाचा शनिवारी (दि.२६) दुपारी २ वाजेच्या सुमारास सोनगड ते व्यारादरम्यान अपघात झाला. बालानी यांचे दैव बलवत्तर म्हणून वाहनाने तीन पलट्या घेऊनही सुदैवाने फार काही दुखापत झाली नाही. बालानी यांच्या डोक्याला व कानाला मार लागला आहे, तर वाहनातील बालानी यांच्या मुलगीसह दोन्ही नाती व त्यांचे मित्र सुखरूप आहेत. बालानी यांना अपघातानंतर काही वेळातच सोनगड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले.
भाजपचे गटनेते भगत बालानी यांची मोठी मुलगी सोनल सजनानी यांच्यासह दोघी नाती जिनिशा व त्रिशा यांना अहमदाबाद येथे सासरी सोडण्यासाठी बालानींसह त्यांचे मित्र सुरेश मंधान हे शनिवारी सकाळी ८.३० वाजेला जळगावातून निघाले होते. दुपारी १ वाजता नंदुरबार येथे जेवण झाल्यानंतर त्यांनी नवापूरमार्गे प्रवास सुरू केला. दुपारी २ वाजेदरम्यान सोनगड ते व्यारादरम्यान स्वत: वाहन चालवत असलेल्या बालानी यांना डुलकी लागली. त्यात त्यांचे वाहन थेट दुभाजकावर धडकले. त्यानंतर वाहनाने विरुद्ध बाजूने तीन ते चार पलटी घेतल्या. यात वाहनातील चालक बालानी यांच्या डोक्याला मार लागल्याने ते काही वेळ बेशुद्ध पडले होते, तर वाहनातील त्यांचे मित्र, मुलगी व नातींना काहीही दुखापत झाली नाही. तातडीने रुग्णवाहिकेतून बालानी यांच्यावर सोनगड येथे उपचार करण्यात आले. त्याठिकाणी सीटीस्कॅनची तपासणीदरम्यान त्यांच्या मेंदूत रक्ताची गाठ झाल्याचे तसेच कानातून रक्त आले. तसेच बालानी यांना सोनगडहून नंदुरबार येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात वाहनाच्या वरच्या भागाचे मोठे नुकसान झाले आहे.