जळगाव : देशातील जातीय व धार्मिक तणावाची प्रकरणे वाढत असताना प्रसिद्ध साहित्यक, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. खानेसुमारीची सुरुवात करून इंग्रजांनी देशामध्ये जातीयता पसरवली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते जळगावमध्ये चित्रकार राजू बाविस्कर लिखित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.
पुढे बोलताना नेमाडे म्हणाले की, आज जातीयता आणि जाती व्यवस्था या वेगवेगळ्या असून, यातील फरक समजून घेणे गरजेचे आहे. खानेसुमारीची सुरुवात करून इंग्रजांनी देशामध्ये जातीयता पसरवली. भारतीय परंपरा, रामायण, महाभारत या संदर्भामध्ये नेमाडे यांनी आपले विचार मांडले. आपल्या देशात १९ हजारपेक्षा जास्त जाती आहेत. पूर्वी ही जातीय व्यवस्था आडवी होती. इंग्रजांनी तिला उभी केली, असेही ते म्हणाले.
समाजाचे गणित बिघडत चाललंयसाहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित कवी श्रीकांत देशमुख यांनी लेखक होणे हे आजच्या काळात अतिशय अवघड असल्याचे म्हटले. लेखकांना संरक्षणात वावरावे लागण हे भयंकर काळाचे प्रतीक आहे. याचा अर्थ समाजाचे गणित बिघडले आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. लेखकांना जशी रिस्क घ्यावी लागते तशी आता वाचकांनीही रिस्क घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.