चुडामण बोरसेजळगाव : भारुड म्हणजे संतांची कूट रुपके होय. पूर्वी ती गूढ होती. संत एकनाथ महाराजांनी सामाजिकतेवर भाष्य केले. संतांचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम या भारुडाने केले आहे. भारुड म्हणजे प्रबोधनात्मक लोकसाहित्य होय, असे प्रतिपादन प्रख्यात भारुडकार चंदाताई तिवाडी यांनी व्यक्त केले. एका कार्यक्रमासाठी जळगावात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. त्यांच्याशी झालेला हा संवाद.प्रश्न : भारुड म्हणजे नेमके काय?उत्तर : संत ज्ञानेश्वर आणि संत एकनाथ महाराज यांच्या गाथेत या रचना सापडतात. पूर्वी भारुडे ही गूढ होती. नाट्य, अभिनय, नृत्य आणि गायन अशा विविधतेने नटलेल्या लोककलेचा समावेश या भारुडात आहे. या सर्व कलांना एकत्रित आणून बहुरुढीचे दर्शन घडविणारे भारुड हे जणू एकपात्री प्रयोगासारखेच आहे.प्रश्न : भारुडाचे प्रकार किती... ?उत्तर : भारुडाचे तीन प्रकार आहेत. पहिले भजनी, दुसरे सोंगी आणि तिसरे बोली भारुड होय. भजनी म्हणजे भजनात सांगितले जाते ते भारुड, सोंगी म्हणजे अनेक वाद्ये आणि त्याला अनुसरुन केलेले सोंग होय. तिसरे बोली भारुड हे कीर्तन आणि प्रवचनातून म्हटले जाते.प्रश्न : पूर्वी भारुड हे पात्र पुरुषच सादर करीत.. मग महिला कशा याकडे वळल्या.उत्तर : तमाशाचेही स्वरुप बदलले. तसे भारुडाचेही काही ठिकाणी विडंबन होत गेले. पंढरपूरात आम्ही महिला व बालिकांसाठी प्रबोधनात्मक शिबिर घ्यायचो. यातून मग महिलांच्या सामाजिक उणीवांची जाणीव होऊन भारुडाकडे वळले आणि इथपर्यंत पोहचले आहे.संतांच्या पारंपरिक रचना साभिनय सादर करीत त्या एड्स, पल्स पोलीओ, गुटखा, कुटुंब नियोजन, दारूबंदी, स्त्रीभृणहत्या, प्राणीप्रश्न, महिला सबलीकरण राष्ट्रीय एकात्मता या विषयी आत्मीयतेने दृष्टांत देतात.चंदाताई तिवाडी ह्या भारूडातून समाजप्रबोधन करत असताना समाज कार्यातही व्यस्त आहेत. त्यांनी पंढरपूरनजीक गोपाळपूर येथे खडकाळ माळरानावर तळागाळातील दीडशे गरजूंना वीज-पाणी आदी सोयींसकट घरे बांधून दिली. या वस्तीतील मुलंच्या शिक्षणासाठी गोपालपूर येथे श्रीगोपालकृष्ण माध्यमिक विद्यालय सुरू केले.पांडुरंगच आपल्याकडून ते करुन घेत असल्याचे त्या म्हणाल्या.प्रभावी वत्कृत्व, अभिनय शैली, नृत्याची जोड याद्वारे उपदेशाचे चिमटे काढत तर कधी विनादी शैलीतून भारुड सादर होत असते. - चंदाताई तिवाडी
संतांचे भारुड म्हणजे प्रबोधनात्मक लोकसाहित्य - भारुडकार चंदाताई तिवाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2020 10:50 PM