जळगाव : संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेल्या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. त्यावेळी आयोजित केलेल्या निदर्शनांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी दिली, तसेच कार्यकर्त्यांंनी यावेळी शासनाने कोरोनामुळे दिलेले नियम पाळावेत, असे आवाहनदेखील केले.
ॲड. पाटील यांनी सांगितले की, केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी कायदे रद्द करावेत, त्यासोबतच महागाई आणि सार्वजनिक संपत्तीच्या विक्रीकरणास विरोध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस या आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यावेळी निदर्शने केली जातील. सोबतच कोरोनामुळे शासनाने घालून दिलेले नियम पाळले जातील. यावेळी राष्ट्रवादीचे मंगला पाटील, वाल्मीक पाटील, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, तसेच इतर पदाधिकाऱ्यांनीदेखील जिल्हा आणि तालुका पातळीवर निदर्शनात सहभागी व्हावे, असे आवाहनदेखील ॲड. पाटील यांनी यावेळी केले.
या पत्रकार परिषदेला संयुक्त किसान मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, अजय बढे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.