जळगाव : सौंदर्यप्रसाधनाच्या वस्तू घेतल्यानंतर दुकानाच्या बाहेर आलेल्या पूजा सुनील पवार (वय २६) हिच्यावर पतीने चाकूने सपासप सात वार केले. त्यानंतर घरी जाऊन शालक शंकर भिका चव्हाण (वय १८) याच्या छातीत चाकू खुपसला. दैव बलवत्तर म्हणून शंकर बचावला आहे. त्याला जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्याला गोदावरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पूजाचा पती सुनील बळीराम पवार (वय ३४, रा.शिवाजीनगर, जळगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना बुधवारी दुपारी २ वाजता पाळधी, ता. धरणगाव येथे मारवाडी गल्लीत घडली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील पवार व पत्नी पूजा यांच्यात गेल्या वर्षभरापासून वाद सुरू होते. १८ फेब्रुवारी रोजी चुलत भाऊ मंगेश चव्हाण याचे लग्न असल्याने पूजा ही १६ फेब्रुवारी रोजी माहेरी पाळधी येथे गेली होती. यानंतरही दोघांमध्ये वादच असल्याने पूजा सासरी जळगावला आलीच नाही. मंगळवारी तो पत्नीला घ्यायला पाळधी येथे गेला होता, मात्र तिने येण्यास नकार दिला. त्यावरून दोघांमध्ये वाद झाले होते. त्यानंतर पत्नी पूजा हिने पाळधी पोलिसात पतीविरुद्ध तक्रार दिली होती. त्यावरून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली होती. याच प्रकरणात सुनील याला पोलिसांनी बुधवारी चौकशीसाठी बोलावले होते. मात्र तो पोलिसात न जाता थेट बाजारात गेला. तेथून चाकू विकत घेऊन पत्नी कुठे आहे याची माहिती घेतली. मारवाडी गल्लीत एका दुकानातून सौंदर्यप्रसाधनाच्या वस्तू घेतल्यानंतर पूजा दुकानाच्या बाहेर येताच दबा धरून बसलेल्या सुनील याने तिच्या किडनीजवळ दोन्ही बाजूंनी तसेच खांद्यावर व डोक्यावर सपासप वार केले. रक्तबंबाळ अवस्थेत ती जागेवरच कोसळली.
जिवंत आहे की मृत पाहण्यासाठी पुन्हा आला मागे
पत्नीवर वार केल्यानंतर सुनील हा तिच्या वडिलांच्या घरी गेला. तेथे शंकर चव्हाण या शालकाच्या पोटात त्याने चाकू खुपसला. शंकर याने गंभीर वार चुकवला, त्यामुळे तो बचावला. त्यानंतर पत्नी जिवंत आहे की मृत याची खात्री करण्यासाठी तो पुन्हा घटनास्थळावर आला. हातातील चाकू फेकून तो याच भागात फिरत होता. त्याचवेळी लोकांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेमुळे काही मिनिटातच बाजारपेठ बंद झाली. सर्व दुकाने बंद झाल्याने रस्त्यावर शुकशुकाट होता.
नागपूरच्या घटनेची पुनरावृत्ती टळली
नागपूर शहरात दोन दिवसांपूर्वीच एका तरुणाने पत्नी, मुलगा, मुलगी, मेहुणी व सासू अशा पाच जणांची हत्या केल्याची घटना घडली. याच घटनेची पुनरावृत्ती पाळधीत होणार होती; मात्र घरी कुणीच नसल्याने ते बचावले. शालक असल्याने त्याने त्याच्यावर वार केले. सातत्याने पत्नीवर संशय व इतर कारणांनी दोघांमध्ये भांडण होत होते. त्यातूनच ही हत्या झाल्याची माहिती नातेवाइकांनी दिली. पूजा हिला दोन जुळ्या मुली व मुलगा आहे. पूजा हिला पाच बहिणी व एक भाऊ आहे.
पूजावर सात ठिकाणी घाव
पूजाला जिल्हा रुग्णालयात आणले असता जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार, अंमलदार नाना तायडे, योगेश साबळे व ललित भदाणे यांनी रुग्णालयात धाव घेतली. शवविच्छेदनगृहात ठेवलेल्या मृतदेहाची पाहणी केली असता पूजाच्या शरीरावर सात ठिकाणी घाव घालण्यात आले होते. हे घाव अतिशय खोलवर गेलेले होते. अतिशय क्रूरपणे ही हत्या केल्याचे दिसून आले.
चुलत शालकाकडे मागितले लग्नाचे फोटो
सुनील हा मंगळवारी पाळधीत गेला होता. तेथे त्याचा पत्नीशी वाद झाला होता. त्यानंतर चुलत शालक मंगेश चव्हाण याच्याकडे लग्नाचे फोटो दाखव म्हणून त्याने आग्रह धरला होता; मात्र फोटो अजून मिळालेले नसल्याचे मंगेश याने सांगितले होते. तेथून तो परत जळगावला आला होता. दरम्यान, सुनील हा मनपात कंत्राटी पद्धतीने कामाला असल्याचे सांगण्यात आले.